व्हॅलेंटाईन वीकमध्ये ९६ जोडपी अडकली विवाहबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST2021-02-16T04:41:16+5:302021-02-16T04:41:16+5:30

माघी गणेशोत्सवदिनी मात्र सर्वाधिक विवाह नोंदणी लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विवाहाची तारीख संस्मरणीय ठरावी यासाठी विवाहेच्छुक जोडपी अनोख्या ...

96 couples get married during Valentine's Week | व्हॅलेंटाईन वीकमध्ये ९६ जोडपी अडकली विवाहबंधनात

व्हॅलेंटाईन वीकमध्ये ९६ जोडपी अडकली विवाहबंधनात

माघी गणेशोत्सवदिनी मात्र सर्वाधिक विवाह नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : विवाहाची तारीख संस्मरणीय ठरावी यासाठी विवाहेच्छुक जोडपी अनोख्या तारखेचा विवाह मुहूर्त साधतात. यादिवशी विवाह करण्याची जोडप्यांमध्ये अनोखी क्रेझ असते. फेब्रुवारी महिन्यात असलेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये ठाणे जिल्ह्यातील ९६ जोडपी विवाह बंधनात अडकली. मात्र, रविवारी व्हॅलेंटाईन डे आल्याने त्यांचा या दिवशी विवाह करण्याचा मुहूर्त हुकला. या जोडप्यांनी एक दिवसानंतर म्हणजेच माघी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला. या दिवशी सर्वाधिक म्हणजेच ६२ जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली.

व्हॅलेंटाइन डे, अनोखी तारीख, नववर्ष, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी विवाहेच्छुक जोडपी उत्सुक असतात; परंतु जगभरात कोरोनाचा हाहाकार पसरला आणि मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले. मार्च ते मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त अधिक असतात. या लॉकडाऊनमुळे अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले. गर्दीवर सरकारने बंदी घातली. अनलॉकनंतर विवाह सोहळे कमी लोकांच्या उपस्थितीत करण्याची अट घातली. त्यामुळे लॉकडाऊन काळात नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची संख्या वाढली. जिल्हा विवाहनोंदणी कार्यालयाने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी कार्यालय सुरू ठेवले होते; परंतु कोरोनाच्या भीतीपोटी एकही नोंदणी झाली नव्हती. मे ते ऑगस्ट यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील ३५० हून अधिक जोडप्यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ३० जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. व्हॅलेंटाईन डेलादेखील विवाह करण्याची जोडप्यांमध्ये क्रेझ आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. ७ आणि १४ तारखेला रविवार आल्याने तसेच १३ तारखेला शनिवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने ८ ते १२ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन वीकमध्ये ९६ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. ८ फेब्रुवारी रोजी २२, ९ फेब्रुवारी रोजी १५, १० फेब्रुवारी रोजी ९, ११ फेब्रुवारी रोजी ११, १२ फेब्रुवारी रोजी ३९ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले, तर सोमवारी माघी गणेशोत्सवाच्या दिवशी ६२ जोडप्यांनी विवाहासाठी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केली.

-----------------

रविवारी व्हॅलेंटाईन डे आल्याने या दिवशी विवाह नोंदणी कार्यालयात येऊन जोडप्यांना विवाह करता आला नाही. त्यामुळे सोमवारी त्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे १५ ते २० जोडपी सध्या विवाहासाठी येत आहेत. सोमवारी मात्र संख्या जास्त होती.

- अनिल यादव, विवाह नोंदणी अधिकारी, जिल्हा विवाह नोंदणी कार्यालय

Web Title: 96 couples get married during Valentine's Week