नितीन पंडित
भिवंडी: मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र नदी पात्रातील पाणी पातळी वाढली आहे.कल्याण येथील उल्हास नदी मध्ये पाणी वाढल्याने त्याचे बॅक वॉटर तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील चौधरपाडा येथील धूळखाडीतील पाणी वाढल्याने येथील सोनाळे बापगाव हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.तर रस्त्या नजीक असलेल्या श्री डिजिटल स्केल व निखिल जैन यांच्या मालकीच्या गोदामात ९ कामगार काल पासून अडकून पडले होते.बुधवारी सकाळी आणखी पाणी वाढल्याने या कामगारांनी मालकास या बाबत माहिती दिली.
त्यांनतर स्थानिक ग्रामपंचायत सरपंच वनिता जाधव व ग्रामविस्तार अधिकारी व्यंकटेश धोंडगे यांना ही माहिती समजताच त्यांनी तहसीलदार अभिजित खोले यांना या बाबत कळविले.त्यानंतर मंडळ अधिकारी संतोष आगिवले यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी चित्रा विशे हे भिवंडी अग्निशामक दलाच्या आपत्तीव्यवस्थापन पथकासह घटनास्थळी दाखल होत,होडीच्या मदतीने एक तासाने अडकून पडलेल्या कामगारांची सुखरूप सुटका केली आहे.
अडकून पडलेल्या कामगारांची प्रशासनाने सुटका केल्याने कामगारांनी अग्निशमन दल व महसूल व ग्राम प्रशासनाचे आभार मानले.