८८ ग्रा.पं होणार हागणदारी मुक्त
By Admin | Updated: September 26, 2015 22:23 IST2015-09-26T22:23:50+5:302015-09-26T22:23:50+5:30
राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील ८८ ग्राम पंचायतींमध्ये युद्धपातळीवर जनजागृती करून त्याना २ आॅक्टोंबरपर्यंत हागणदरी मुक्त करण्याचा

८८ ग्रा.पं होणार हागणदारी मुक्त
ठाणे: राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील ८८ ग्राम पंचायतींमध्ये युद्धपातळीवर जनजागृती करून त्याना २ आॅक्टोंबरपर्यंत हागणदरी मुक्त करण्याचा संकल्प ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था विभागाने केला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील गावपाड्यांमध्ये ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवले जात आहे.
या जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ भिवंडी तालुक्यातील रहनाळ गावात शुक्रवारी करण्यात आला. खासदार कपील पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानसी बोरकर यांनी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून हा संकल्प केला.
८८ ग्राम पंचायतींचे सरपंच,उपस्थित गावकरी, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्राम सेवक, आदींना स्वच्छतेची शपथ देऊन हागणदरीमुक्त होण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. जिल्ह्यात सुमारे ४२५ ग्राम पंचायती आहेत. त्यातील ८८ ग्राम पंचायती २ आॅक्टोबरपर्यंत हागणदरी मुक्त करायच्या आहेत. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ग्राम सभा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी या ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्याचे घोषीत करणार आहेत. यासाठी या ग्राम पंचायतींमधील प्रत्येक घरासाठी शौचालय बांधण्यासाठी गावागावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीला सुमारे ३७ हजार शौचालये असल्याचा दावा केला जात असून या वर्षात ४२ हजार शौचालये बांधण्यासाठी नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)