८१ वर्षीय आजोबा वर्षभराने परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:36 IST2017-07-31T00:36:55+5:302017-07-31T00:36:55+5:30
पत्नीच्या निधनानंतर बेपत्ता होणारे ८१ वर्षीय गोंविद वडार हे वर्षभरानंतर अखेर घरी परतले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस म्हणून उपचार सुरू असताना

८१ वर्षीय आजोबा वर्षभराने परतले
ठाणे : पत्नीच्या निधनानंतर बेपत्ता होणारे ८१ वर्षीय गोंविद वडार हे वर्षभरानंतर अखेर घरी परतले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस म्हणून उपचार सुरू असताना, त्यांच्याकडून मिळालेल्या ‘नेर्ले’ गावाच्या नावावरून त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले.
वडार यांना ५ जुलै २०१७ रोजी वर्तकनगर परिसरातून काही लोकांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. वडार यांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले असून, अल्सरसह त्यांना ऐकायला येत नव्हते. विस्मरणचाही आजार होता. नीट बोलता येत नव्हते. याचदरम्यान, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रेखा गजलवार आणि डॉ. खुशबू चौहान व डॉ. कालिंदी कांबळे यांनी उपचार केले. उपचाराला प्रतिसाद देऊ लागल्यावर त्यांची देखरेख करणाºया शिल्पा कचरे, प्रतिभा भोईर, श्रीमती महाजन, शिवानी देशमुख, समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद आणि धनंजय पारखे यांनी विचारपूस केली. त्यावेळी वडार यांनी आपले नाव आणि नेर्ले असे गावाचे नाव सांगितले. त्यानुसार, नेर्ले या गावाचा शोध इंटरनेटवर घेण्यास सुरुवात केल्यावर सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेर्ले गाव असल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा रुग्णालय प्रशासनासमोर अचडण उभी राहिली. याचदरम्यान, वडार यांच्याकडे आणखी विचारपूस केल्यावर त्यांनी त्यांच्या चुलतभावाचे नाव सांगितले. त्यावेळी ते सांगलीकर असल्याचे समोर आले. त्यानुसार, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांची माहिती दिली. नुकतेच त्यांचा मुलगा अरुण वडार यांनी त्यांना घरी नेले.