ठाण्याच्या आखाड्यात ८०५ पैलवान

By Admin | Updated: February 8, 2017 04:16 IST2017-02-08T04:16:23+5:302017-02-08T04:16:23+5:30

ठाणे महापालिका निवडणुकीच्या मुलख मैदानात नाराज झालेल्या बंडोबांना थोपविण्यात विविध पक्षांना यश आले

805 palavans in Thane area | ठाण्याच्या आखाड्यात ८०५ पैलवान

ठाण्याच्या आखाड्यात ८०५ पैलवान

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या मुलख मैदानात नाराज झालेल्या बंडोबांना थोपविण्यात विविध पक्षांना यश आले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल २८८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर ५५ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने आता ३३ प्रभागातून १३१ जागांसाठी तब्बल ८०५ उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. यासाठी बुधवारपासून खऱ्या अर्थाने या उमेदवारांचा प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरवात होणार आहे.
येत्या २१ फेबु्रवारी रोजी ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक हे पालिकेत निवडून जाणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सोपस्कार संपले आहेत. माघार घेणाऱ्यांत शिवसेनेच्या आणि भाजपाच्या अधिक बंडखोरांचा समावेश आहे. त्यातही प्रभाग क्रमांक तीन मधून काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले जयनाथ पूर्णेकर यांनी अखेरच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार बेंदुगडे यांचा उमेदवारी अर्ज कागदपत्रे अपूर्ण असल्याने बाद ठरविण्यात आला आहे. यापूर्वी भाजपाचे संजय घाडीगावकर आणि लॉरेन्स डिसोझा यांचा देखील उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
दरम्यान शिवसेनेच्या नगरसेविका पूजा वाघ, नम्रता भोसले, अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. माजी महापौर स्मीता इंदुलकर यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णकुमार नायर, प्रमिला भांगे, निलेश लोहरे, रामदास पडवळ, हेमलाता पडवळ, गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी अर्ज मागे घेतले आहेत. वागळे इस्टेट येथे सेनेच्या माजी नगरसेविका संगीता घाग यांनी माघार घेतली असली तरी चंद्रगुप्त घाग हे मात्र अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळविणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहा पाटील यांनीसुध्दा माघार घेतली आहे. तर, नौपाड्यातून बंडखोरी करणाऱ्या चारही सेनेच्या शाखाप्रमुख थंड झाले असून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपच्या २२ पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले होते. त्यापैकी माजी उपमहापौर सुभाष काळे, विद्यमान नगरसेविका सुशिला लोखंडे यांचे पती सुनील तसेच विशाखा कणकोसे, महेंद्र जैन, निलेश कोळी, घोडबंदर परिसरातील कैलास म्हात्रे, दत्ता घाडगे, योगेश भोईर, नवनाथ पासलकर अशा सर्वच बंडखोरांनी माघार घेतली. शशी यादव यांनीसुध्दा माघार घेतली असली तरी त्यांनी भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीतूनदेखील प्रभाग क्रमांक तीन मधून स्नेहा पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करुन तिकीट मिळविले होते. तर मनोहर साळवी, मिलिंद साळवी, यांच्यासह प्रभाग क्रमांक २ मधील राष्ट्रवादीचे लकीसिंह गिल यांनी देखील माघार घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर करीना दयलानी यांनी माघार घेतली. मनसेने १११ जणांना उमेदवारी दिली होती. परंतु, प्रभाग क्र. १ (अ.) मधून रेखा जाधव, प्रभाग क्र. ३ (अ) मधून मंगल सळवे, प्रभाग क्र. ३० (ब) मधून शाहीन अस्लम घडीयाली, प्रभाग क्र. ३० (ड)मधून रिझवान अहमद शेख यांचे तांत्रिक कारणांमुळे तर प्रभाग क्र. ५ (ब) मधून नम्रता ऐतवडेकर यांचे नाव चुकून आल्याने या पाच जणांचे अर्ज बाद झाले आहेत. तसेच, मनसेचे तिकीट न मिळाल्याने पक्षातील तीन पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्र मांक १७ ड मधून आठवले यांच्या रिपाइं पक्षातून पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे हे निवडणूक लढत आहेत. याच जागेसाठी भारिप बहुजन महासंघाचे किसान मोरे आणि मंगेश वानखडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. आंबेडकरी मतांची विभागणी होऊ नये म्हणून दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली.
आता ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजपा, आघाडी आणि मनसे अशी चौरंगी लढत होणार असून बुधवारपासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. (प्रतिनिधी)


उल्हासनगरात ७८ जागेसाठी ४८२ उमेदवार रिंगणात, ८२ जणांची माघार
उल्हासनगर : महापालिकेच्या निवडणूक रिंगणातून ७९ जणांनी माघार घेतल्याने ७८ जागेसाठी ४८२ उमेदवार उभे ठाकले आहेत. मात्र, खरी लढत भाजप, शिवसेना व साई पक्षात असून तिन्ही पक्षांनी प्रचार रॅली, चौक सभा सुरू केल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे, रिपाइं, भारिप, बीएसपी आदी पक्षाची ताकद विशिष्ट प्रभागा पुरती मर्यादीत असल्याचे चित्र आहे. उल्हासनगर पालिकेवर भाजपचा महापौर अशी हाक देऊन ओमी कलानी सोबत आघाडी केली. प्रत्यक्षात आघाडी नव्हे तर टीमला मागच्या दाराने प्रवेश दिला आहे. पक्षाचे नेते व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप व कलाच्या एकून ७० उमेदवारांना पक्षाच्या कमळ तर टीमच्या ४ जणाना रासप पक्षाचे नगारा चिन्हे दिले. रिपाइं आठवले गटाच्या लता निकम, पीआरपीचे प्रमोद टाले, शारदा अंभोरे तर एका अपक्षाला भाजप पुरस्कृत केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष लाल पंजाबी यांना उमेदवारी नाकारताच ते दंड थोपटून साई पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरले. तसेच ओमी टीममधील मोहन कंडारे, त्रिलोकाणी, पंडित निकम, विकास खरात यांच्यासह अनेक राष्ट्रवादी व साई पक्षाला जवळ करून रिंगणात उतरले आहेत. शिवसेना नगरसेवक प्रधान पाटील, नगरसेविका समिधा कोरडे, जयेंद्र मोरे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने प्रभाग क्रं्र-२० मधील तिन्ही उमेदवार सुरक्षित झाले. भाजपा-साई पक्षाने मराठी उमेदवार रिंगणात उतरवून रंगत वाढविली आहे. साई पक्षाने ५९ ठिकाणी उमेदवार उभे केले. त्या प्रमुख जीवन इदनानी व माजी महापौर आशा इदनानी यांनी दोन प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीचे ४२, साई ५९, भारिपचे १२, मनसे २३, बीएसपीचे २२ आदीसह ४७९ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

Web Title: 805 palavans in Thane area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.