एमआयडीसीत ८० टक्के मालमत्ताधारकांना सुधारित बिलांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST2021-05-01T04:38:06+5:302021-05-01T04:38:06+5:30

डोंबिवली: एमआयडीसीच्या निवासी भागातील वाढीव मालमत्ताकर कमी करण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात झाला होता. मात्र, तीन महिन्यानंतर वितरीत केलेली ...

80% of property owners in MIDC are waiting for revised bills | एमआयडीसीत ८० टक्के मालमत्ताधारकांना सुधारित बिलांची प्रतीक्षा

एमआयडीसीत ८० टक्के मालमत्ताधारकांना सुधारित बिलांची प्रतीक्षा

डोंबिवली: एमआयडीसीच्या निवासी भागातील वाढीव मालमत्ताकर कमी करण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात झाला होता. मात्र, तीन महिन्यानंतर वितरीत केलेली सुधारित बिले आतापर्यंत केवळ २० टक्केच मालमत्ताधारकांनाच मिळाली आहेत. पाच महिने उलटूनही ८० टक्के मालमत्ताधारकांना अद्याप ती न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे.

याआधीच्या बिलामध्ये घराचे वार्षिक करयोग्य मूल्य अवाजवी व चुकीच्या पद्धतीने नोंदवल्याचा आक्षेप रहिवाशांचा होता. बांधकाम झालेल्या वर्षातील रेडी रेकनरनुसार वार्षिक करयोग्य मूल्य नोंदवावे तर निवासी विभागाला पाणीपुरवठा हा थेट एमआयडीसीमधून होतो तसेच ड्रेनेजसंबंधी देखभालही एमआयडीसी करते. त्यामुळे पाणीपट्टी आणि इतर लाभकरातून सुटका व्हावी, अशी विनंती त्यांच्याकडून केली गेली होती. यासंदर्भात डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने सातत्याने केलेला पाठपुराव्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने मनपात विशेष बैठक होऊन वाढीव बिले कमी करून सुधारित बिले रहिवाशांना पाठविण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात घेतला गेला. मात्र, दुरुस्तीची बिले तीन महिन्यांनी रहिवाशांच्या हाती पडली. परंतु आतापर्यंत २० टक्केच मालमत्ताधारकांना ती मिळाली असल्याचे डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे म्हणणे आहे. मनपाच्या ई प्रभाग कार्यालयात मालमत्ताधारक जाऊन अथवा फोनवर संपर्क करून चौकशी करीत आहेत. परंतु, तेथूनही त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने आता नक्की सुधारित बिले मिळणार आहेत की नाही असा प्रश्न संबंधित मालमत्ताधारकांना पडला आहे. मागील मालमत्ताकर बिले ही सात ते आठपट अधिक आल्याने बहुतेकांनी ती भरली नव्हती. आता ही सुधारित बिले भरण्यास नागरिक तयार असतानाही ती मिळत नसल्याने ते हैराण झाले आहेत. येत्या जून, जुलैमध्ये नवीन वर्षाची बिले वाटप होईल. तत्पूर्वी सुधारित बिले देण्यात यावी, अशी मागणी त्यांची आहे. यासंदर्भात केडीएमसीचे कर निर्धारक संकलक विभागाचे अधिकारी विनय कुलकर्णी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

------------------------------------------------------

Web Title: 80% of property owners in MIDC are waiting for revised bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.