८० बांधकाम परवाने अडचणीत?
By Admin | Updated: September 1, 2016 02:52 IST2016-09-01T02:52:07+5:302016-09-01T02:52:07+5:30
नगररचनाकार संजीव करपे यांच्या बेपत्ता होण्यामुळे महापालिकेचा नगररचनाकार विभाग बांधकाम परवान्याबाबत वादात सापडला आहे

८० बांधकाम परवाने अडचणीत?
उल्हासनगर : नगररचनाकार संजीव करपे यांच्या बेपत्ता होण्यामुळे महापालिकेचा नगररचनाकार विभाग बांधकाम परवान्याबाबत वादात सापडला आहे. करपे यांनी दिलेले सुमारे ८० बांधकाम परवाने जुन्या की नवीन विकास आराखड्यानुसार दिले, याच्या चौकशीची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण आशाण यांनी केली आहे. त्यांनी आयुक्तांकडे सर्वच बांधकाम परवान्यांची चौकशी करावी, असे सुचवले आहे. यामुळे करपे यांनी दिलेले बांधकाम परवाने अडचणीत आले आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेले नगररचनाकार करपे यांचा १२ दिवसांनंतरही थांगपत्ता लागलेला नाही.
यापूर्वीचे नगररचनाकार जेलची हवा खाऊन आले असून तराणी यांना लाचलुचपत विभागाने अटक केली होती. तर, प्रल्हाद होगे- पाटील, किरण सोनावणे यांचे बांधकाम परवाने वादात सापडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे. करपे यांनी दिलेल्या बांधकाम परवान्यांची चौकशी करण्याची मागणी आमदार ज्योती कलानी यांनी केल्यावर पालिका वर्तुळात खळबळ उडाली.
बेपत्ता झालेले करपे मागील महिन्यात फक्त आठ दिवस पालिकेत आले होते. आठ दिवसांत ३९ बांधकाम परवाने मंजूर कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटी अधिकारी व खाजगी वास्तुविशारद यांच्या मदतीने करपे यांनी पालिकेबाहेरच बांधकाम परवाने मंजूर केले असून यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. यातील बहुतांश बांधकाम परवाने खोट्या सनदेवर, खुल्या जागेवर, आरक्षित भूखंडांवर व खोट्या कागदांवर झाल्याचा आरोप कलानी यांनी केला आहे.
३९ पैकी जे परवाने नियमानुसार आहेत, त्यांना स्थगिती आदेशातून वगळण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. तत्कालीन, नगररचनाकार अरुण गुडगुडे यांनी दिलेल्या ११० बांधकाम परवान्यांची चौकशी आठ वर्षांपासून सुरू असताना बिल्डरांनी यातील ९० टक्के बांधकामे पूर्ण करून विक्रीही सुरू केली आहे. (प्रतिनिधी)