ठाण्यातील ७५ खासगी रुग्णालयांना मिळू लागला पुरेसा ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:09 AM2021-04-24T00:09:53+5:302021-04-24T00:10:10+5:30

 ठाणे  शहरात सध्याच्या घडीला १४ हजार ५४२ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील ६१३ रुग्ण हे गंभीर असून, ४४२ आयसीयुमध्ये, तर १७१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

75 private hospitals in Thane started getting adequate oxygen | ठाण्यातील ७५ खासगी रुग्णालयांना मिळू लागला पुरेसा ऑक्सिजन

ठाण्यातील ७५ खासगी रुग्णालयांना मिळू लागला पुरेसा ऑक्सिजन

Next


लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे  : ठाणे  महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरला आता येत्या दोन दिवसांत ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याने तेथील ऑक्सिजनचे बेड पुन्हा सुरू केले जाणार आहेत. तर दुसरीकडे आता शहरातील खासगी कोविड आणि नॉनकोविड अशा ७५ रुग्णालयांनादेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे पुरेसा साठा उपलब्ध होऊ लागला आहे. तूर्तास ऑक्सिजनचे संकट टळले असले, तरीदेखील अतिरिक्त साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली जात आहे.        
 ठाणे  शहरात सध्याच्या घडीला १४ हजार ५४२ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील ६१३ रुग्ण हे गंभीर असून, ४४२ आयसीयुमध्ये, तर १७१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबरच खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा जवळजवळ संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसत होते. शहरात आजघडीला २५० खासगी रुग्णालये आहेत. त्यातील २५ खासगी कोविड रुग्णालये आहेत, तर ५० नॉनकोविड रुग्णालयातदेखील कोविड संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना सध्या ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. 

‘पार्किंग प्लाझा’ला लवकरच ३५० ऑक्सिजनचे बेड
शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना रोज ६८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. पालकमंत्री आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांची ऑक्सिजनची समस्या तूर्तास मार्गी लावली आहे. अतिरिक्त साठा मिळत नसला, तरीदेखील पुरेसा साठा या रुग्णालयांना मिळू लागला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाणे  अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिली. 

रुग्णसंख्या वाढत असल्याने जास्तीचा ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे वाढीव साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पालिकेने ऑक्सिजनचे दोन प्लाॅन्ट उभारण्याचे काम हाती घेतले असून, दोन ते तीन दिवसांत पार्किंग प्लाझा येथील ३५० ऑक्सिजनचे बेड सुरू करण्यात येणार आहेत. दुसरीकडे खासगी रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होत आहे.

Web Title: 75 private hospitals in Thane started getting adequate oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.