जिल्ह्यात ८३ रुग्णालयात ७,१३१ बेड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST2021-02-25T04:55:16+5:302021-02-25T04:55:16+5:30

ठाणे : मागील पंधरवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीचा ...

7,131 beds available in 83 hospitals in the district | जिल्ह्यात ८३ रुग्णालयात ७,१३१ बेड उपलब्ध

जिल्ह्यात ८३ रुग्णालयात ७,१३१ बेड उपलब्ध

ठाणे : मागील पंधरवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात असलेले कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह जिल्हा कोविड रुग्णालय असे ८३ रुग्णालये सज्ज केली आहेत. या रुग्णालयांमध्ये आठ हजार ७८४ खाटांची संख्या असून सात हजार १३१ खाटांची उपलब्धता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यास आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून भविष्यातील रुग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाने शिरकाव केला. सुरुवातीला तुरळक प्रमाणात असलेल्या या आजाराने मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हाहाकार उडविला होता. सध्या जिल्ह्यातील सहा महानगरपालिका व ठाणे ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या दोन लाख ६१ हजार ६६७ इतकी झाली असून त्यापैकी दोन लाख ५० हजार ७४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आतापर्यंत सहा हजार २४६ जणांना जीव गमवावे लागले आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीला या आजाराने घातलेले थैमान यामुळे अनेकदा कोरोना बाधितांना बेड उपलब्ध न झाल्यामुळे व त्यांच्यावर उपचार न झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागल्याची ओरड होत होती. त्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील असलेली खाटांची क्षमता रुग्णांच्या तुलनेत अपुरी पडू लागली होती. याची गांभीर्याने दाखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसह जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आली होती. तसेच जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांतर्गत पालिका आयुक्तांनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबरोबरच अनेक खासगी रुग्णालयांचे कोविड रुग्णालयात रुपांतर केले होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने व रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने अनेक रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात रुपांतर केले होते. असे असताना आता, मागील १५ दिवसांपासून कोरोनाने आपले डोके पुन्हा वर काढले आहे. यामुळे यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आतापासून कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील क्षेत्रातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि जिल्हा कोविड रुग्णालय यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि जिल्हा कोविड रुग्णालय अशी ८३ रुग्णालये सज्ज ठेवली असून या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागातील बेड, सामान्य बेड अशी एकूण या रुग्णालयांमध्ये आठ हजार ७८४ बेड्सची संख्या आहे. सध्या त्यापैकी सात हजार १३१ बेडची उपलब्धता असून एक हजार ६५३ बेडवर रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Web Title: 7,131 beds available in 83 hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.