४५ वर्षांवरील ७० हजार जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:35+5:302021-04-04T04:41:35+5:30
भाईंदर : मीरा-भाईंदर पालिका रोज १५०० ते १६०० चाचण्या करत असून, संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे प्रमाणही प्रती रुग्णामागे २१ ...

४५ वर्षांवरील ७० हजार जणांनी घेतली लस
भाईंदर : मीरा-भाईंदर पालिका रोज १५०० ते १६०० चाचण्या करत असून, संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे प्रमाणही प्रती रुग्णामागे २१ इतके आहे. राज्य सरकारकडून एक लाख दोन हजार लस मिळाल्या आहेत. ४५ वर्षांवरील तीन लाख ३३ हजार नागरिक शहरात असून, आतापर्यंत ७० हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ३२ हजार लस शिल्लक आहेत. रोज ३८०० ते ४००० नागरिकांना लस दिली जात आहे . लसीकरणासाठी पालिकेची १० केंद्रे, तर खासगी ९ केंद्रे असून, आणखी केंद्रे वाढविण्याची तयारी केलेली आहे, असे आयुक्त दिलीप ढोले म्हणाले.
पोलीस व मनपा एकत्र काम करत आहेत. प्रभागानुसार २३ पथके नेमली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पालिकेने आतापर्यंत दहा लाखांचा दंड वसूल केला आहे. १६० आस्थापनांवर कारवाई केल्याची माहिती आयुक्त ढोले यांनी दिली. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त अमित काळे हेही उपस्थित होते.
शहरात सध्या २ हजार ५२६ कोरोनाचे रुग्ण असून, त्यातील १५०० रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याचा दर १४.३० टक्के इतका असून, मृत्यूचा दर २.६५ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांच्या वर आहे. महापालिकेच्या विविध कोरोना उपचार केंद्र व रुग्णालयांत चार हजार ७०० खाटा असून, त्यातील २३ टक्के खाटांवर रुग्ण आहेत. ६७ टक्के खाटा रिक्त असून, भविष्यात रुग्ण वाढले तरी त्याची तयारी पालिकेने केली आहे. पालिकेकडे ८५ व्हेंटिलेटर बेड असून, १५ वापरात आहेत, तर ७० रिक्त आहेत. २०२ ऑक्सिजन खाटा, तर ४३ आयसीयू बेड आहेत .
-------------------------------------
कोरोना रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचारी तैनात
पोलिसांनी आतापर्यंत ९४ आस्थापनांवर गुन्हा दाखल केला असून, मास्क न घालणाऱ्या १३५० जणांकडून चार लाखांचा दंड वसूल केला आहे. कोरोना रोखण्यासाठी ४०० पोलीस कर्मचारी व ८० अधिकारी तैनात असल्याचे काळे म्हणाले.