आचारसंहितेपूर्वीच शहरात ७० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू, अंबरनाथ नगर परिषदेची धडपड यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 04:36 AM2019-03-19T04:36:05+5:302019-03-19T04:39:03+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, याची कल्पना असल्याने अंबरनाथ नगर परिषदेने मंजूर कामांना सुरुवात करण्याची धडपड सुरू केली होती.

70 crore road works started in the city before the Model Code of Conduct, Ambernath Municipal Council's struggle was successful | आचारसंहितेपूर्वीच शहरात ७० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू, अंबरनाथ नगर परिषदेची धडपड यशस्वी

आचारसंहितेपूर्वीच शहरात ७० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू, अंबरनाथ नगर परिषदेची धडपड यशस्वी

Next

अंबरनाथ  - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, याची कल्पना असल्याने अंबरनाथ नगर परिषदेने मंजूर कामांना सुरुवात करण्याची धडपड सुरू केली होती. त्यांची ही धडपड यशस्वी झाली असून सुमारे ७० कोटींच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. काम मिळालेल्या ठेकेदारांना कामाचे आदेश दिल्याने आता निवडणूक काळातही शहरातील कामे सुरूच राहण्यास मदत होणार आहे. तर, आचारसंहितेच्या आधीच ही कामे सुरू झाल्याने नगरसेवक निश्चिंत झाले आहेत.
अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने गेल्या आर्थिक वर्षात शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे विषय मंजूर केले होते. या रस्त्यांच्या कामाच्या निविदाही पालिकेने काढल्या होत्या. मात्र, या निविदा आचारसंहितेत अडकतील की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आचारसंहितेचा कालावधी गृहीत धरत पालिका अधिकाऱ्यांनी कामांचा आराखडा आणि त्यांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. प्रत्येक निविदेचा कार्यकाळ ठरलेल्या वेळेनुसार केल्याने या निविदा मंजुरीसाठी घेण्यात आलेली स्थायीची बैठकदेखील वेळेत पार पडली. तसेच निविदा प्रक्रिया आणि स्थायी समितीची बैठक यांच्यात योग्य ताळमेळ बसल्याने निविदांना वेळेत मंजुरी घेण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात शहरातील महत्त्वाची कामे अडकणार नाहीत, हे पाहा, असे स्पष्ट आदेश मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिले होते. त्यानुसार, शहरातील महत्त्वाचे काँक्रिट रस्ते आणि इतर प्रकल्पांची कामे वेळेत करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू होती. एखाददुसरा विषयवगळता शहरातील सर्व मंजूर कामांना सुरुवात करून देण्यात अधिकारी यशस्वी झाले आहेत.
५० लाखांखालील विषय, ५० लाख ते एक कोटीच्या दरम्यानची कामे, एक ते दीड कोटींची कामे आणि त्यापुढील मोठी कामे यांच्या स्वतंत्र निविदा पालिकेने मागवल्या होत्या. त्या विषयांच्या निविदा आल्यावर लागलीच स्थायी समितीची मंजुरी घेऊन ठेकेदारांना कामाचे आदेश देण्यात आले. त्यामुळे एकाचवेळी शहरात महत्त्वाच्या रस्त्यांची कामे सुरू होण्यास मदत झाली आहे.
या रस्त्यांसोबत शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा विषयही मंजूर करण्यात आला आहे. त्यात २५ लाख ते ५० लाखांच्या विषयांचा समावेश आहे. लहानमोठ्या कामांमुळे निवडणुकीच्या काळात शहरात सर्वत्र कामे सुरूच राहणार आहे. त्याचा लाभ नागरिकांना होणार आहे. तसेच प्रशासकीय कामकाज करताना या कामांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.
शहरातील विकासकामांसोबतच एमएमआरडीएने मंजूर केलेल्या कामांचाही पालिकेने पाठपुरावा केला असून ही कामेदेखील जलद गतीने सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे या कामांनादेखील आचारसंहितेचा कोणताच फटका बसणार नाही. अशाच प्रकारचा महत्त्वाचा निर्णय कल्याण-बदलापूर रस्त्याच्या बाबतीत झाला असून या ठेकेदारालाही कामाचे आदेश दिल्याने त्या रस्त्याचे काम करण्यातही अडचण येणार नाही.

निवडणूक काळात शहरातील या रस्त्यांची कामे होणार

नारायणनगर पाण्याच्या टाकीसमोरील रस्ता, शिवाजीनगर शिवसेना शाळा ते पोलीस स्टेशन रोड, साई सेक्शन रोड, मोविली गावामधील रस्ता, खामकरवाडीमधील रस्ता, राहुलनगर येथील रस्ता, वांद्रापाडा ते लकी किराणा स्टोअर रस्ता, जावसई ते महेंद्रनगर रस्ता, हेरंब मंदिर रस्ता, कानसई तीन टायर रस्ता, हरिओम पार्क रस्ता, वडोळगाव रस्ता, मोतीराम प्राइड रस्ता, फादर अ‍ॅग्नेल रस्ता, दीपकनगर रस्ता, गायकवाडपाडा रस्ता, के.टी. स्टील गेटसमोरील रस्ता, शास्त्रीनगर फातिमा शाळेमागे समाजमंदिर व व्यायामशाळा उभारणे, केबी रोड ते शारदा चौक रस्ता आणि सदाशिवपुरम ते मोरिवलीपाडा रस्ता या महत्त्वाच्या रस्त्यांचा या विकासकामांअंतर्गत सुरू झालेल्या कामात समावेश आहे. रस्त्यांची कामे मार्गी लागल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

Web Title: 70 crore road works started in the city before the Model Code of Conduct, Ambernath Municipal Council's struggle was successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे