नवी मुंबईतून भेसळयुक्त खजूर, खारीकासह लवंगाचा सात काेटी २५ लाखांचा साठा जप्त
By जितेंद्र कालेकर | Updated: October 13, 2023 23:01 IST2023-10-13T23:00:53+5:302023-10-13T23:01:09+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई: महापे आणि तुर्भे एमआयडीसीमध्ये छापे

नवी मुंबईतून भेसळयुक्त खजूर, खारीकासह लवंगाचा सात काेटी २५ लाखांचा साठा जप्त
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नवी मुंबईतील महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरियामधील क्रिसेंट कोल्डस्टोरेज या कंपनीमध्ये छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने तब्बल एक कोटी ७२ लाख ६२ हजारांचा ९५ हजार ३४ किलोचा भेसळयुक्त खजूर आणि खारीक तसेच तुर्भे भागातून पाच कोटी ५५ लाख सहा हजार ८५० रुपयांचा भेसळयुक्त लवंगाचा साठा असा सात काेटी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी शुक्रवारी दिली.
देशमुख यांच्याच मार्गदर्शनाखाली निर्भेळ, सकस आणि सुरक्षित अन्न पदार्थाची साठवणूक तसेच विक्री होते किंवा नाही, याच्या तपासणीची विशेष मोहीम या विभागाने सुरु केली आहे. अशीच कारवाई नवी मुंबईतील महापेमधील मे. क्रिसेंट कोल्डस्टोरेज प्रा. लि शितगृहामध्ये १० ऑक्टाेंबर २०२३ रोजी झाली. याच तपासणीमध्ये याठिकाणी खजूर आणि खारीक या अन्न पदार्थाचे दहा नमुने घेऊन त्यांचा एक कोटी ७२ लाख ६२ हजारांचा ९५ हजार ३४ किलोचा संशयास्पद भेसळयुक्त साठा जप्त केला. अन्नपदार्थाच्या लेबलवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत आवश्यक व बंधनकारक लेबल मजकुरही नव्हता. या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यिात आले आहेत.
दरम्यान, नवी मुंबईतल्याच तुर्भे एमआयडीसीतील टीटीसी इंडस्ट्रीयल एरियामधील मेसर्स मयुर कोल्डस्टोरेज प्रा. लि. या शीतगृहाचीही ११ ऑक्टाेंबर रोजी तपासणी करण्यात आली. यामध्ये लवंग कांडीचे दहा नमुने घेण्यात आले. त्यांचाही पाच कोटी ५५ लाख ६ हजार ८५० रुपयांचा दोन लाख ४६ हजार ४०७ किलोचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला.
या अन्नपदार्थाच्या लेबलवरही अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक व बंधनकारक मजकुराचा लेबल नव्हता. ही कारवाई सहायक आयुक्त गौरव जगताप, व्यंकट चव्हाण, योगेश ढाणे आणि दिगंबर भोगावड आदींच्या पथकाने केली.