- अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील हरित आणि ना-विकास क्षेत्रात तब्बल ६ हजार ४२६ अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे धक्कादायक वास्तव महापालिकेच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. यामध्ये सर्वाधिक ४,३६५ बांधकामे कळवा भागात झाली आहेत. वागळे आणि लोकमान्यनगर भागात एकही बांधकाम हरित क्षेत्रात झाले नसल्याचेही यामध्ये स्पष्ट झाले आहे. दिव्यात शीळ परिसरात उभ्या राहिलेल्या २१ अनधिकृत इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने कारवाई केली. त्यानिमित्ताने महापालिका प्रशासनाने हे सर्वेक्षण हाती घेतले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने मुंब्रा-शीळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ व १८० आणि शीळ येथे उभारलेल्या एकूण २१ अनधिकृत इमारतींवर कारवाई केली होती. या २१ इमारती हरित क्षेत्रावर उभ्या होत्या. त्यामुळे शहरातील इतर ठिकाणी असलेल्या हरित आणि ना-विकास क्षेत्रात किती बांधकामे उभी राहिली, त्यांची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायलयाने दिले होते.
दिवा, वर्तकनगर प्रभागातील सर्वेक्षण अजून सुरू मागील काही दिवसांपासून सुरू असलेला हे सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे. हरित क्षेत्र आणि ना- विकास क्षेत्रात तब्बल ६,४२६ अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे समोर आले आहे. दिवा आणि वर्तकनगर प्रभागातील सर्वेक्षण अजून सुरू आहे. इतर प्रभागांतील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या बांधकामांमध्ये बैठ्या चाळी, इमारती, शाळा व इतर बांधकामांचा समावेश आहे.
३० ते ४० वर्षे जुनी बांधकामेसर्वेक्षणानुसार हरित आणि ना-विकास क्षेत्रात झालेली ही काही बांधकामे तब्बल ३० ते ४० वर्षांपूर्वीची आहेत, तर काही १० ते २० वर्षे जुनी आहेत. मागील कित्येक वर्षे यामध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास असून, त्यांना आता बाहेर काढणे शक्य आहे का? याचा विचार महापालिका करीत आहे.
सर्वाधिक ४३६५ बांधकामे कळव्यातमहापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे कळवा भागात आहेत. येथे ४,३६५ अनधिकृत बांधकामे असून, त्याखालोखाल नौपाडा कोपरीमध्ये १४०० बांधकामे आहेत.