उल्हासनगरात ६ माजी महापौर रिंगणात
By Admin | Updated: February 9, 2017 03:57 IST2017-02-09T03:57:57+5:302017-02-09T03:57:57+5:30
महापालिकेच्या ६ माजी महापौर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने यापैकी एकीच्या गळ्यात महापौरांची माळ पडण्याची शक्यता आ

उल्हासनगरात ६ माजी महापौर रिंगणात
सदानंद नाईक , उल्हासनगर
महापालिकेच्या ६ माजी महापौर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने यापैकी एकीच्या गळ्यात महापौरांची माळ पडण्याची शक्यता आहे. विजयाची खात्री देऊन या माजी महापौरांनी निवडणूक रिंगणात रंगत आणली आहे.
उल्हासनगर विकासात सर्वच माजी महापौरांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या विशिष्ट कामाच्या कार्यशैलीने नागरिकांवर प्रभाव टाकला असून सर्वांनीच विजयाची शक्यता व्यक्त केली आहे. महापालिकेच्या पहिल्या महिला महापौर म्हणून शिवसेनेच्या यशस्विनी नाईक यांना मान मिळाला. त्यांनी पालिका प्रशासनाला शिस्त लावून वचक बसवला होता. मात्र, पक्षाने तिकीट नाकारल्याने त्या बंडखोरी करून साई पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्र.-१४ मधून निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्र.-१२ मधून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर माजी महापौर मालती करोतिया उतरल्या आहेत. शिवसेनेच्या माजी महापौर लीलाबाई आशान प्रभाग क्र.-१४ मधून, माजी महापौर विद्या निर्मले याही शिवसेनेतून बंडखोरी करून प्रभाग क्र.-१९ मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
शिवसेनेच्या सर्वाधिक यशस्वी कार्यकाळातील माजी महापौर राजश्री चौधरी प्रभाग क्र.-१० मधून, तर आशा इदनानी साई पक्षाच्या तिकिटावर रिंगणात आहेत. प्रत्येक महापौरांचा कार्यकाळ गाजला असून विकासकामांवर निवडून देण्यासाठी नागरिकांकडे साकडे घालत आहेत. महापालिकेत शिवसेना विरूद्ध भाजपा-ओमी टीम अशी सरळ लढत असली, तरी सत्तेच्या चाव्या साई पक्षाकडे राहणार असल्याचे संकेत राजकीयतज्ज्ञ देत आहेत.
भाजपा-ओमी टीमकडून महापौरपदासाठी पंचम कलानी, मीना आयलानी, जया माखिजा, तर शिवसेनेकडून माजी महापौर राजश्री चौधरी, वसुधा बोडारे, माजी महापौर लीलाबाई आशान, साई पक्षाकडून माजी महापौर आशा इदनानी यांचे नाव पुढे केले जात आहे. काँग्रेसच्या माजी महापौर मालती करोतिया, माजी उपमहापौर जया साधवानी, रिपाइंच्या पंचशीला पवार यांचे नावही चर्चेत आले आहे. महापौरपदासाठी कोण बाजी मारतो, हे २३ फेब्रुवारी रोजी निकालाच्या दिवशी समजणार आहे.