मुंब्रा, शीळ भागातील ५७ हजार वीज्र ग्राहकांनी महावितरणचे थकविले तब्बल ३०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:21 IST2018-03-23T18:21:18+5:302018-03-23T18:21:18+5:30
मुंब्रा शीळ भागातील वीज बिलांचा भरणा न करणाºया तब्बल ५७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने खंडीत केल्याची माहिती समोर आली आहे. या खंडीत करण्यात आलेल्या थकबाकीदारांनी तब्बल ३०० कोटी थकविले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंब्रा, शीळ भागातील ५७ हजार वीज्र ग्राहकांनी महावितरणचे थकविले तब्बल ३०० कोटी
ठाणे - महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या ठाणे-३ या विभागातील मुंब्रा-शिळ या भागात महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने धडक कारवाई करुन मागील आठ महिन्यात १३६४ वीज चोऱ्या पकडल्या आहेत. यामध्ये त्यांच्याकडून एक कोटी ९५ लाख वसुल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महावितरणने मुंब्रा, शीळ भागात तब्बल ५७ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ग्राहकांकडे मुद्दल आणि व्याजासह ३०० कोटींची थकबाकी असल्याची माहिती महावितरणच्या सुत्रांनी दिली आहे.
महावितरणने आॅगस्ट २०१७ पासून पकडलेल्या १३६४ केसेसमध्ये एकूण १९ हजार ५११ इतक्या युनिटची वीज चोरी करण्यात आली असून याचे मुल्य सुमारे एक कोटी ९५ लाख इतके होते. यापैकी ६५० विजचोरांनी सुमारे एक कोटी सात लाख रु पयांचा भरणा केला आहे. यामध्ये ६५० पैकी ४९० ग्राहकांनी नियमानुसार तडजोड करून सुमारे १८ लाखांची दंडाची रक्कम महावितरणकडे भरणा केली आहे. तर उर्वरीत ग्राहकांकडे महावितरणचे अधिकारी पाठपुरावा करत असून त्यांनी दंडासह रक्कम न भरल्यास त्यांच्यावर रितसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
अभय योजनेस अत्यंत अल्प प्रतिसाद
महावितरणने कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी वेळोवेळी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. परंतु मुंब्रा व शिळ या भागातून अशा योजनांना नेहमीच अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सध्या या भागात सुमारे ५७ हजार इतक्या ग्राहकांची वीज कायम स्वरूपी खंडित केली असून त्यांच्याकडे २५० कोटी मुद्दल व ५० कोटी व्याज अशी एकूण सुमारे ३०० कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. असे असले तरी सध्या सुरु असलेल्या अभय योजने अंतर्गत ठाणे ३ विभागात नव्याने रु जू झालेले टीमने सुमारे दोन हजार ग्राहकांकडून सुमारे दोन कोटी वसूल केले आहेत.
एजंट लोकांच्या भूलथापांना बळी न पडता; ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
महावितरणने चालू व थकीत वीज बिल वसुली करता तसेच नवीन जोडणी व अन्य सुविधांकरीता कोणत्याही एजंटची नेमणूक केली नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा एजंटच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. ग्राहकांनी एजंटवर विश्वास टाकल्यास आणि त्यांची फसवणूक झाल्यास त्याबाबतची कोणतीही जबाबदारी महावितरण घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सध्या मार्च एंड असल्यामुळे ग्राहकांनी त्यांचे चालू तसेच थकीत बिल दंडासह भरवीत. याकरता महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्रात जावे किंवा महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अॅपचा वापर करावा, असे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्याना मारहाण
वीज बील वसुली व इतर दैनंदिन कामे करताना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण होण्याच्या घटना मुंब्रा व शिळ या भागात मोठ्या प्रमाणात होतात. मागील आठ महिन्यात कर्मचाºयांना मारहाणीच्या एकूण सहा घटना घडल्या आहेत. यातील सर्व दोषी ग्राहकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.