ठाणे : ठाण्यातील नागरिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या रविवारी झालेल्या ‘जन की बात’ कार्यक्रमाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्याच्या पहिल्याच कार्यक्रमात विविध विभागांच्या ५०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी तक्रारी ऐकून घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
कोरोना काळातील निर्बंधांमुळे सव्वा वर्षाच्या काळात जनसामान्यांच्या समस्या रखडल्या आहेत. त्यातच महाविकास आघाडी सरकारकडून पोकळ आश्वासने, होणारी टोलवाटोलवी आणि महापालिकेतील भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे ‘जन की बात’, ‘तुमचे लोकप्रतिनिधी, तुमच्या दारी' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश सचिव संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोपरी परिसरातील नागरिकांनी केंद्र, राज्य आणि महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबद्दल तक्रारी केल्या. मात्र, त्यातील बहुतांश तक्रारी महापालिकेसंदर्भात होत्या. या समस्या खासदार सहस्रबुद्धे, आमदार डावखरे व आमदार केळकर यांनी ऐकून घेतल्या. तसेच त्यावर संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.