शाई धरणासाठी पालिकेची ५० कोटींची तरतूद?
By Admin | Updated: March 24, 2017 01:13 IST2017-03-24T01:13:58+5:302017-03-24T01:13:58+5:30
मागील कित्येक वर्षे कागदावर असलेल्या शाई धरणाच्या उभारणीकरिता आता ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

शाई धरणासाठी पालिकेची ५० कोटींची तरतूद?
ठाणे : मागील कित्येक वर्षे कागदावर असलेल्या शाई धरणाच्या उभारणीकरिता आता ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात या धरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
भविष्यात ठाणेकरांची तहान भागावी, या उद्देशाने महापालिकेने मोठ्या प्रयत्नानंतर शाई धरणाचा प्रकल्प खेचून आणून त्याला मंजुरी मिळवली होती. २००७ मध्ये या धरणाला मुहूर्त सापडून जलसंपदा विभागाला शाई धरणासाठीचे सर्वेक्षण आणि खर्चाचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, याचा सर्व्हेदेखील पूर्ण झाला आणि धरणासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला.
पालिकेने जरी या धरणाची परवानगी खेचून आणली असली तरीदेखील महासभेत लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या अनास्थेमुळे हे धरण उभारण्याची महापालिकेची क्षमता नसल्याचे कारण पुढे केले गेले. धरणाचे काम एमएमआरडीएने करावे व त्यातून मिळणारे पाणी ठाण्याबरोबरच इतर महापालिकांना द्यावे, असे सांगण्यात आले होते. त्यावेळीच शाई धरण कागदावर राहणार, हे स्पष्ट झाले. एमएमआरडीएने या धरणाचे काम करण्यात अनास्था दाखवली आणि पालिकेच्या आशा निराशेत परावर्तित झाल्या.
सत्ताधाऱ्यांनी त्याच वेळेस सतर्कता दाखवली असती, तर आज ठाणेकरांना हक्काचे धरण मिळाले असतेच, शिवाय २०४६ पर्यंत ठाणेकरांची तहान भागू शकली असती. मागील वर्षी पाणीसंकट ओढवले आणि पुन्हा शाई धरणाचा मुद्दा चर्चेत आला. परंतु, पाऊस चांगला झाल्याने पुन्हा धरणाचा मुद्दा बासनात गुंडाळला गेला. (प्रतिनिधी)