४१ सदस्यांचे समर्थन आवश्यक
By Admin | Updated: March 7, 2016 02:23 IST2016-03-07T02:23:02+5:302016-03-07T02:23:02+5:30
परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची व्यूहरचना विरोधकांनी पूर्ण केली असली, तरी अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर ते तोंडघशी पडण्याची शक्यता आहे

४१ सदस्यांचे समर्थन आवश्यक
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची व्यूहरचना विरोधकांनी पूर्ण केली असली, तरी अपुऱ्या संख्याबळाच्या आधारावर ते तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील ही जोडगोळी सध्या एकत्र आहे. या दिग्गज नेत्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणता सदस्य करेल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. त्यामुळे दोन तृतीयांश सदस्यांचा आकडा गाठणे विरोधकांना मुश्कील असल्याचे दिसून येते.
शिवसेना हा सध्या जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर फेकला गेला आहे. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी सत्ता असावी असे शिवसेनेला वाटत आहे. यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले महेंद्र दळवी, अॅड. राजीव साबळे यांना सर्वाधिक सत्तेची स्वप्ने पडत असल्याचे राजकीय हालचालींवरुन दिसून येते. शिवसेनेचे १६ सदस्य असून त्यामध्ये आता महेंद्र दळवी, राजीव साबळे, कविता गायकवाड, शामकांत भोकरे यांची साथ लाभली आहे. त्याचप्रमाणे अन्य नाराज सदस्य संपर्कात असून ते किती आहेत हे दळवी यांनी सांगितले नाही.
अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन दुग्धविकास, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य, समाज कल्याण अशी सभापती पदे शिवाय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस-शेकापकडे आहेत. निवडून आलेल्या महत्वाच्या सदस्यांना किमान सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ देण्याचा अलिखित करार दोन्ही पक्ष नेतृत्वाने केला होता. त्याची मुदतही कधीच संपलेली आहे, असे नाराज सदस्य सांगत आहेत. त्यामुळे मुदत संपलेली असताना नवीन निवडी का जाहीर केल्या जात नाहीत, असा प्रश्न नाराज सदस्यांकडून केला जात
आहेत.
यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन पक्षप्रतोद शामकांत भोकरे आणि शुभदा तटकरे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीची अपेक्षा होती, तसेच अन्य काही सदस्यांना सभापतीपदाची आस असल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे शेकापचे पनवेल येथील एकनाथ देशेकर हेही उपाध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत आणि त्यामुळे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेला ते शिवसेनेच्या गोटात जाऊन बसल्याचे दिसून आले. शेकापच्या अन्य काही सदस्यांनाही सभापतीपद मिळावे असे दिसून येते.
या नाराज सदस्यांना एकत्र बांधण्याचे काम महेंद्र दळवी आणि अॅड.राजीव साबळे करीत आहेत. नुकतीच पार पडलेली सर्वसाधारण सभा आटोपल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सदस्यांसह शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठकही घेतली होती.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता
आहे.