शहापुरातील ४० वर्षांची पाणीयोजना निघणार निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:41+5:302021-04-03T04:36:41+5:30

भातसानगर : शहापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या लोकसंख्येचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच ...

40 year water project in Shahapur will be completed | शहापुरातील ४० वर्षांची पाणीयोजना निघणार निकाली

शहापुरातील ४० वर्षांची पाणीयोजना निघणार निकाली

भातसानगर : शहापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून या लोकसंख्येचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी अहवाल तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. त्यामुळे ४० वर्षांपूर्वीची जुनी झालेली पाणीपुरवठा योजना लवकरच निकाली निघणार असून नव्या योजनेसाठी हालचालींना वेग आला आहे.

याआधी या शहराला २०११ च्या जनगणनेनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी १६ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र आज याचा शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून मुंबई- नाशिक महामार्ग, मुंबई- कसारा- घोटी रेल्वेमार्ग,समृध्दी महामार्ग, वाडा- शहापूर महामार्ग, शहापूर- मुरबाड महामार्ग व आटगाव, पूनाधे, आसनगाव येथे असलेल्या कंपन्यामुळे शहापुरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी समस्या हा गहण विषय बनल्याने काही दिवसापूर्वी प्राधिकरणाचे सदस्य सचिव निंबाळकर यांनी शहराची पाहणी केली व तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार सध्या पाणी योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून या शहराला भविष्यकालीन पाणी योजना तयार करण्यासाठी किमान ३५ ते ४० कोटी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भातसा नदीतून दोन किलोमीटरच्या अंतरावरून हे पाणी आणावे लागणार आहे . सध्याच्या स्थितीत याच नदीवरून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र ही योजना ४० वर्षांपूर्वीची जुनी असल्याने ती मोडकळीस आली आहे. शिवाय या योजनेवर शुद्धीकरण केंद्र नसल्याने मोठी अडचण येत आहे.

नवीन योजनेत शहरात पाण्याचे तीन ते चार जलकुंभ, पॉवर हाऊस, पाणी शुद्धीकरण केंद्र, जलवाहिन्या यांचा समावेश केला आहे.

शहरातील पाणीप्रश्न सुटण्यास होणार मदत

आज शहापुरला एका बाजूने वळसा घालून भातसा नदी वाहते. मात्र येथील नागरिकांना तिचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळू नये ही शोकांतिका असून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून नवी योजना लवकरच पूर्णत्वास येणार असल्याने शहापुरकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याआधी अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र भविष्याचा विचार केल्यास ती पाणी योजना तांत्रिक बाबी विचारात घेता मंजूर झाली नाही. आता मात्र सुसज्ज अशा योजनेचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले.

Web Title: 40 year water project in Shahapur will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.