- हितेन नाईक, पालघरनॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर बसवला आहे.
बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसविल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे काम १५६ किमी लांब आहे. पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये याचे काम सुरू आहे. फुल-स्पॅन गर्डर्सना बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे एनएचएसआरसीएलकडून सांगितले.
शिळफाटा ते झिरपपर्यंत काम प्रगतिपथावर
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्याच्या शिळफाटा दरम्यान २१ किमी लांबीचा बोगदा बनविल्यानंतर शिळफाटा ते झरळी गाव (महाराष्ट्र-गुजरात सीमा) पर्यंत १३५ किमी उंचावरील मार्गिकेचे कामही प्रगतिपथावर आहे.
ठाणे, विरार आणि बोईसर येथील बुलेट ट्रेनच्या ३ स्थानकांमध्ये एकूण १.३ किमी लांबीचा भाग अशा एकूण ११ किमी लांबीच्या भागाचा यात समावेश आहे.
सुमारे ९७० मेट्रिक टन वजन
प्रत्येक ४० मीटर लांबीचा पीएसकी बॉक्स गर्डर सुमारे ९७० मेट्रिक टन वजनाचा असतो. ज्यामुळे तो भारताच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वांत जड गर्डर ठरला असून, तो यशस्वीरीत्या साखरे येथे बसविला.
हे गर्डर्स कोणतेही बांधकाम सांधे न ठेवता, एकसंध स्वरूपात घडवले जात आहेत. प्रत्येक गर्डरसाठी ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टील वापरले जाते.
शिळफाटा ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या मार्गिकेवर एकूण १३ कास्टिंग यार्ड्स नियोजित करण्यात आले आहेत. त्यापैकी सध्या ५ यार्ड्स कार्यान्वित आहेत. पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी यावेळी स्वतः भेट देत कामाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले.