उल्हासनगरात मानस इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी
By सदानंद नाईक | Updated: September 22, 2022 15:42 IST2022-09-22T15:42:28+5:302022-09-22T15:42:57+5:30
एका महिन्याच्या अंतराने तीन इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या असून धोकादायक इमारती बाबत शासन परिपत्रक प्रसिद्ध करीत नसल्या बाबत नांगरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत.

उल्हासनगरात मानस इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी
उल्हासनगर : कॅम्प नं-५ सर्वांनंद हॉस्पिटल परिसरातील मानस इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्याच्या दुकानावर दुपारी २ वाजता कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला. तर ढिगाऱ्याखाली ४ ते ५ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एका महिन्याच्या अंतराने तीन इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या असून धोकादायक इमारती बाबत शासन परिपत्रक प्रसिद्ध करीत नसल्या बाबत नांगरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत.
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून एका महिन्यात तीन इमारतीचें स्लॅब कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. कोमल पार्क व साई सदन इमारतीचा स्लॅब व गच्ची कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर गुरवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मानस पॅलेस या पाच मजली इमारतीचा चौथ्या मजल्याच्या स्लॅब थेट तळमजल्याच्या दुकानावर कोसळला.
या दुर्घटनेत सागर ओचानी-१९, रेणू धोलांदास धनवानी-५५, धोलानदास धनावनी-५८, प्रिया धनवानी-२४ असे चार जणांचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी ढिगारा उचलण्याचे काम शिरू असून आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी घटनास्थळी भेट दिली. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी घटनास्थळी ठाण मांडून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून मानस इमारत खाली केली असून इमारतीला स्ट्रॅक्टरल ऑडिटची नोटीस दिल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. इमारत दुर्घटनेत बेघर झालेल्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे संकेत महापालिका आयुक्त शेख यांनी दिली. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल मिळल्याचे सांगून सन-२०२१ पर्यंतची अवैध बांधकामे नियमित तर धोकादायक इमारतीचे पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन दिले होते.
तसेच काही दिवसात शासन परिपत्रक प्रसिद्ध करण्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही परिपत्रक प्रसिद्ध न झाल्याने, नागरिकांत नाराजी आहे. इतर कामे बाजूला ठेवून शहरतील धोकादायक व जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत परिपत्रक काढण्याची मागणी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. मानस इमारत दुर्घटनेत मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.