कल्याण-डोंबिवलीत वर्षभरात आगीच्या ३८५ घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:28 IST2018-06-01T00:28:34+5:302018-06-01T00:28:34+5:30
एप्रिल ते मार्च या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ३८५ ठिकाणी आगी लागल्या. याशिवाय, झाडे पडण्याच्या घटनांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे

कल्याण-डोंबिवलीत वर्षभरात आगीच्या ३८५ घटना
सचिन सागरे
कल्याण : एप्रिल ते मार्च या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ३८५ ठिकाणी आगी लागल्या. याशिवाय, झाडे पडण्याच्या घटनांचे प्रमाणसुद्धा जास्त आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने अशा घटनांना तोंड देताना चांगलीच दमछाक होताना दिसते.
कुठेही आग लागली किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन विभागाला पाचारण केले जाते. कल्याण-डोंबिवली शहरांसह भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वाडा, शहापूर, भिवंडी, मुरबाड आदी आसपासच्या शहरांतही ही सेवा पुरवली जाते. या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासह प्राणी पकडणे, अडकलेल्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची सुटका करणे, पाण्यात बुडालेल्यांना बाहेर काढणे, कोसळलेल्या इमारतीतील रहिवाशांचे प्राण वाचवणे आदी जबाबदारीही पार पाडावी लागते. विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात आगीच्या ३८५ तसेच झाडे पडण्याच्या ५१५ आणि इतर ३०४ घटना घडल्या आहेत. महापालिकेच्या अग्निशमन विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. २२८ मंजूर पदे असून त्यापैकी अवघे १०७ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. अपुºया संख्येमुळेच कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाºयांना सहन करावा लागतो आहे.
टिटवाळा शहराची लोकसंख्या सध्या वाढते आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी अग्निशमन दलाला लागणारा कालावधी लक्षात घेता अग्निशमन कार्यालय असणे आवश्यक आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्यातही आवश्यक कर्मचारी मिळाल्यास आम्ही येथे तातडीने अग्निशमन कार्यालय सुरू करू.
- सुधाकर कुलकर्णी (फायर आॅफिसर)