विद्युत विभागाच्या खोदकामामुळे ३५ वृक्षांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST2021-05-06T04:42:56+5:302021-05-06T04:42:56+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि विद्युत विभागात आता वृक्ष धोकादायक झाल्याच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. मासुंदा ...

विद्युत विभागाच्या खोदकामामुळे ३५ वृक्षांना धोका
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि विद्युत विभागात आता वृक्ष धोकादायक झाल्याच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. मासुंदा तलाव परिसरात विद्युत विभागाने केलेल्या खोदकामामुळे ३५ वृक्ष धोकादायक झाल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे. मात्र, दोन ते तीन वर्षांपूर्वी केलेल्या कामामुळेच हे वृक्ष धोकादायक झाल्याचा विद्युत विभागाचा दावा आहे. दरम्यान, हे वृक्ष कधीही पडू शकतात, त्यामुळे या तलाव परिसरातून ये-जा करताना सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे.
मासुंदा तलावानजीक रिक्षावर वृक्ष पडून दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वृक्ष प्राधिकरण विभागाला खडबडून जाग आली आहे. या विभागाने या भागाची पाहणी व सर्वच वृक्षांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार मुळासकट उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या बाजूलाच दोन फुटांवर खोदकाम करून विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. तसेच या वृक्षाच्या बुंध्यालगतच्या जागेतूनच चार मोठ्या विद्युतवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. परंतु, याबाबत विद्युत विभागाने माहिती दिलेली नसल्याचा दावाही वृक्ष प्राधिकरणाने केला आहे.
त्यानुसार प्राधिकरणाने या संदर्भात विद्युत विभागाला पत्र पाठवून याचे कारण विचारले आहे. त्यात विद्युतवाहिन्या किंवा खांब उभारणीसाठी वृक्षांच्या बुंध्यालगत खोदकाम करू नये आणि वृक्ष धोकादायक होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत कळविले होते. या पत्राला विद्युत विभागानेही उत्तर देऊन वृक्ष प्राधिकरणाने केलेला दावा फेटाळला आहे. उन्मळून पडलेल्या त्या धोकादायक झाडाजवळ दोन ते तीन वर्षांपूर्वी विद्युत खांब बसविला असून, तेथे सध्या कोणतेही नवीन काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे वृक्ष पडण्याचे आणि इतर वृक्ष धोकादायक होण्यामागे विद्युत खांब हे कारण नाही, असे विद्युत विभागाने स्पष्ट केले आहे.
अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची?
- वृक्ष प्राधिकरणाचा दावा विद्युत विभागाने फेटाळला असला तरी मासुंदा तलाव परिसरातील ३५ वृक्ष हे धोकादायक झाले आहेत. त्यामुळे ते कधीही पडू शकतात, असेही आता सांगितले जात आहे.
- भविष्यात जर कधी येथील वृक्ष पडून अपघात झाला तर त्यात आमचा काही दोष नसेल, असेही या दोनही विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
---------------