हळदीविरोधात ३३ गावांचा ठराव

By Admin | Updated: February 26, 2016 04:25 IST2016-02-26T04:25:12+5:302016-02-26T04:25:12+5:30

कल्याण परिसरातील ३३ गावांतील कोळी समाजाच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे लग्न समारंभामधील हळदीतील मद्यपानासह जेवणावळीवरील भपकेबाजपणाला आळा घालण्यासाठी

33 villages resolution against Haldi | हळदीविरोधात ३३ गावांचा ठराव

हळदीविरोधात ३३ गावांचा ठराव

- अरविंद म्हात्रे, चिकणघर
कल्याण परिसरातील ३३ गावांतील कोळी समाजाच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे लग्न समारंभामधील हळदीतील मद्यपानासह जेवणावळीवरील भपकेबाजपणाला आळा घालण्यासाठी ठराव करून वायफळ उधळपट्टी थांबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी (२३ फेब्रुवारी) अटाळी येथे झालेल्या कोळी समाजाच्या चावडी सभेमध्ये हा ठराव संमत केला असून कोळी समाजातून या सुधारणेचे स्वागत होत आहे.
कोळी समाजातील लग्न समारंभ, हळदी समारंभ आणि साखरपुडा समारंभ यासाठी अनावश्यक पैशांची उधळपट्टी केली जाते. अनेकदा कर्ज काढून भपकेबाजपणाची हौस भागवली जात आहे. श्रीमंतांचे अनुकरण गरीबवर्गाकडूनही केले जात असल्याने समाजातील गरीबवर्ग कर्जबाजारी होत आहे. समाज प्रगतीला बाधक ठरणाऱ्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरागत रूढी न बदलता त्यातील भपकेबाजपणाला आळा घालण्यासाठी सभेत काही निर्णय घेण्यात आले.
साखरपुडा वाजतगाजत न करता साध्या पद्धतीने करावा. हळदी समारंभात आॅर्केस्ट्रा आणि डीजेवर नियंत्रण आणण्याबरोबर मद्यपान सक्तीने बंद करावे. हे सर्व समारंभ साध्या पद्धतीने करून होणाऱ्या सामाजिक बचतीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करावा. हे समारंभ साधेपणाने करणाऱ्या समाजबांधवांचा सामाजिक सत्कार करण्यात येणार असल्याचेही ठरावात नमूद केले आहे.

आम्ही मांडा आणि वडवली गावांत यापूर्वी हळदी समारंभात हरिपाठ आणि भजन-कीर्तन ठेवून भपकेबाजपणाला मुरड घातली आहे. याचे समाजाने अनुकरण करायला हवे.
- हभप वासुदेव पाटील, वडवली, तालुका कल्याण

समारंभात अनावश्यक खर्च करण्याऐवजी तो मुलांच्या शिक्षणासाठी खर्च झाला तरी चालेल. कारण, यामुळे सामाजिक विकास घडून समाज सुधारण्यास मदत होईल.
- नारायण पाटील, अध्यक्ष कोळी समाज, कल्याण तालुका

Web Title: 33 villages resolution against Haldi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.