गणेशोत्सवासाठी ३१ हजार चाकरमानी निघाले एसटीने गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST2021-09-02T05:27:39+5:302021-09-02T05:27:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने त्याचा फटका एसटी महामंडळाला बसल्याचे ...

गणेशोत्सवासाठी ३१ हजार चाकरमानी निघाले एसटीने गावाला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने त्याचा फटका एसटी महामंडळाला बसल्याचे दिसून आले होते. परंतु, यंदा एसटीने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आपली सेवा देऊन तिकीट आरक्षणाला सुरुवात केली आहे. यानुसार ठाण्यातून १९ जुलैपासून ऑगस्टअखेरपर्यंत ७०० हून अधिक बसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. तसेच यामध्ये ३५० हून अधिक ग्रुप बुकिंगचा समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबरपासून या एसटी कोकणातील विविध मार्गांवर धावणार असून, त्यातून तब्बल ३१ हजार चाकरमानी गावाला निघणार आहेत.
कोकणात गणपतीला जाण्यासाठी यंदा ठाणे विभागामार्फत ८०० बसचे नियोजन केले आहे. गतवर्षी कोरोनाचे सावट असल्याने शेवटच्या काही दिवसांत बस सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यातच आरटीपीआर चाचणी बंधनकारक केल्याने अवघ्या २१४ इतक्याच बस धावल्या होत्या. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने दीड ते पावणेदोन महिन्यांपूर्वी महामंडळाने बसचे नियोजन करताना आरक्षण सेवाही उपलब्ध करून दिली. यात ठाणे नियंत्रण विभागाअंतर्गत यंदा ८०० ( लालपरी ) गाड्या कोकणात जाण्यासाठी सज्ज केल्या आहेत. त्यातील आतापर्यंत ७०० गाड्यांचे बुकिंग झाले आहे. यामध्ये ३५१ ग्रुप बुकिंग फुल्ल झाले आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बोरीवली, ठाणे खोपट, कल्याण, विठ्ठलवाडी, मुलुंड आणि भांडुप या व आजूबाजूच्या परिसरात चाकरमान्यांची संख्या जास्त आहे.
....
मागील वर्षी कोरोना होता, त्यामुळे एसटीच्या फारशा बस गणेशोत्सवासाठी निघाल्या नव्हत्या. परंतु, यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने ठाणे विभागाकडून ८०० बसचे नियोजन करण्यात आलेले आहे.
- विनोदकुमार भालेराव,
विभागीय नियंत्रक - ठाणे, एसटी महामंडळ