पाकिस्तानी नौकांचा जीवघेणा पाठलाग; मृत श्रीधर चामरेच्या सासऱ्यांनी सांगितला थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 07:06 AM2021-11-09T07:06:58+5:302021-11-09T07:31:53+5:30

फटाक्यांसारखा आवाज येत असल्याने आम्हाला ते दिवाळीनिमित्त फटाके फोडीत असावेत असे वाटले.

30-minute chase of Pakistani patrol boats; The father-in-law of the deceased Sridhar Chamare narrated a thrilling experience | पाकिस्तानी नौकांचा जीवघेणा पाठलाग; मृत श्रीधर चामरेच्या सासऱ्यांनी सांगितला थरारक अनुभव

पाकिस्तानी नौकांचा जीवघेणा पाठलाग; मृत श्रीधर चामरेच्या सासऱ्यांनी सांगितला थरारक अनुभव

googlenewsNext

- हितेन नाईक

पालघर : ‘‘भारतीय क्षेत्रात समुद्रात मासेमारी करीत असताना जवळ आलेल्या पाकिस्तानी गस्ती नौकेने आमच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. आम्ही जीव वाचविण्यासाठी लपत असताना केबिनवर बसलेला श्रीधर चामरे हा खाली केबिनमध्ये उतरत असताना एका गोळीने त्याचा वेध घेतला. मात्र, अर्ध्या तासाच्या आमच्या जीवघेण्या पाठलागानंतर ११ तास प्रवास करून आम्ही सहा जण जीव वाचविण्यात यशस्वी ठरलो’, अशा शब्दात प्रत्यक्षदर्शी तथा श्रीधरचे सासरे नामदेव मेहेर (५६) यांनी मच्छीमार बोटीवरील गोळीबाराच्या घटनेचा थरार ‘लोकमत’ला सांगितला.

‘‘केंद्र शासित प्रदेशातील दिव (वनगबारा) येथील ‘जलपरी’ ही ट्रॉलर २६ ऑक्टोबर रोजी ओखा बंदरातून मासेमारीला रवाना झाली होती. काही तास प्रवास केल्यावर १० दिवस समुद्रात माशांच्या थव्यांचा शोध घेत होतो. शनिवारी भाऊबीजेच्या दिवशी सातपाटी येथे मोबाइलवरून संपर्क करून दुपारी दीड वाजेपर्यंत मी आणि माझा जावई श्रीधर हसतखेळत पत्नी, मुलांशी बोललो होतो,’’ असे नामदेव मेहेर यांनी सांगितले. संध्याकाळी चार वाजता आम्ही समुद्रात सोडलेली ‘डोल’ बोटीत घेत असताना दूरवरून एक स्पीड बोट येताना दिसली. काही अंतरावर आल्यावर  त्यांनी आमच्यावर अचानक गोळीबार करायला सुरुवात केली.

फटाक्यांसारखा आवाज येत असल्याने आम्हाला ते दिवाळीनिमित्त फटाके फोडीत असावेत असे वाटले. परंतु, एक गोळी पाणी ठेवण्याच्या टाकीला लागल्यावर पाकिस्तानी गस्ती नौकेतून गोळीबार होत असल्याचे लक्षात येताच आम्ही सावध झालो. तत्काळ बोटीचे कॅप्टन दिलीप (३६) याने आपल्या ट्रॉलरचे इंजिन सुरू करून वेगाने ती माघारी वळवली. यादरम्यान पाठीमागून जोरदार गोळीबार करीत आमचा पाठलाग सुरू झाल्याने आम्ही सात सहकारी थरथरत होतो. आपल्याला त्यांनी पकडल्यास ते आपली हत्या करतील किंवा आपल्याला पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडावे लागेल, या भीतीने आम्ही कॅप्टनला ट्रॉलर जोराने पळवायला सांगत होतो,’’ असे मेहर यांनी सांगितले.   

‘‘याचदरम्यान पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना मदतीला बोलावल्याने आणखी एक गस्ती नौका त्यांच्या मदतीला आली. त्या दोन गस्ती नौकांद्वारे आमचा जीवघेणा पाठलाग करीत आमच्यावर गोळीबार सुरू झाला. यावेळी  केबिनवर बसलेल्या श्रीधरला मी खाली येण्यास सांगून आम्ही मासे ठेवण्याच्या पेटीत (खणात) लपून बसलो. यादरम्यान कॅप्टन दिलीप याने ट्रॉलरचा स्पीड कमी होत असल्याने ओरडून मदतीला येण्याबाबत सांगितले. आम्ही दोघे लपतछपत इंजिन रूममध्ये शिरल्यावर डिझेलच्या नोझलची नळी तुटून गळती होत असल्याने ट्रॉलरचा वेग कमी होत असल्याचे लक्षात आले.  यावेळी एक युक्ती सुचल्याने जवळच पडलेल्या प्लास्टिक बाटलीचा वापर करून ती गळती काही प्रमाणात रोखण्यात आम्हाला यश आले,’’ अशी माहिती मेहेर यांनी दिली.

‘‘आम्ही यावेळी केबिनमध्ये शिरलो असता कॅप्टनच्या गालाला गोळी चाटून तो जखमी झाला. आता पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडू, या विचाराने आम्ही रडू लागलो; परंतु आपले सारे कौशल्य पणाला लावून कॅप्टन आपली ट्रॉलर वेगाने अंधारातच किनाऱ्याकडे सुसाट पळवत होता. याचदरम्यान केबिनमध्ये श्रीधर निपचित पडल्याचे लक्षात आल्यावर, तो बेशुद्ध पडला असावा या भावनेतून त्याला आम्ही कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न सुरू करताच त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. यावेळी त्याच्या पाठीतून घुसलेली गोळी छातीतून बाहेर आल्याने त्याचा  जागीच मृत्यू झाल्याचे आम्हाला आढळले. 

यादरम्यान सुमारे ३०-४० मिनिटे समुद्रात एखाद्या चित्रपटात शोभून दिसावा असा आमचा जीवघेणा पाठलाग सुरू होता. शेवटी काही अंतरानंतर पाकिस्तानी गस्ती नौकांनी आमचा पाठलाग करणे सोडून दिले आणि त्या गस्ती नौका माघारी निघून गेल्या. ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रत्यक्षात मृत्यूला हुलकावणी देत मोठ्या महत्प्रयासाने पहाटे ३ वाजता आम्ही सुखरूपपणे आपले बंदर गाठले आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला,’’ असे  मेहेर यांनी सांगितले.  

मच्छिमारांना नेले पकडून

या घटनेआधी पोरबंदर येथील दोन ट्रॉलर्स आणि त्यातील मच्छीमारांना पाकिस्तानी सैनिकांनी पकडून नेल्याची माहितीही आम्हाला मिळाल्याचे मेहेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या बाबत केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत असेही ते म्हणाले.

Web Title: 30-minute chase of Pakistani patrol boats; The father-in-law of the deceased Sridhar Chamare narrated a thrilling experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.