उल्हासनगरातील नरेश रोहिडा यांच्यावरील गोळीबार प्रकरणी ३ जणांना अटक
By सदानंद नाईक | Updated: July 21, 2023 17:12 IST2023-07-21T17:12:26+5:302023-07-21T17:12:38+5:30
यातील दिलवार चव्हाण यांच्यावर विविध १० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उल्हासनगरातील नरेश रोहिडा यांच्यावरील गोळीबार प्रकरणी ३ जणांना अटक
उल्हासनगर : भाजपचे माजी पदाधिकारी नरेश रोहिडा यांच्यावरील गोळीबार प्रकरणी हिललाईन पोलिसांनी गुजरात व नाशिक येथून ३ आरोपींना अटक केली. यातील दिलवार चव्हाण यांच्यावर विविध १० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथे राहणारे भाजपचे माजी पदाधिकारी नरेश रोहिडा यांच्या बंगल्या समोर ९ जुलै रोजी सायंकाळी काही तरुण एकत्र आले होते. त्यांच्या हातात गावठी कठ्ठा, पिस्तुल, चॉपर होते. त्यांनी नरेश रोहिडा यांची विचारणा करून शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी रोहिडा यांच्या खाजगी अंगरक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी गोळीबार केला. याप्रकरणी एकाला यापूर्वीच हिललाईन पोलिसांनी अटक करून इतरांच्या अटकेसाठी पथके तैनात केली होती.
अटक केलेल्या दिलीप उर्फ दिलावर चव्हाण याला गुजरात तर मनोज गुप्ता याला नाशिक व गणेश कुरळकल याला हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकडी परिसरातून अटक केली. या गुन्ह्यात अन्य जणांचा समावेश आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालया समोर उभे करून पोलीस कस्टडी मध्ये गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.