क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून तीन लाख ६२ हजारांची फसवणूक, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: December 26, 2022 19:31 IST2022-12-26T19:30:49+5:302022-12-26T19:31:13+5:30
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून ठाण्यातील धनश्री देशमुख (२२) या तरुणीची तीन लाख ६२ हजार ५९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून तीन लाख ६२ हजारांची फसवणूक, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा
ठाणे: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून ठाण्यातील धनश्री देशमुख (२२) या तरुणीची तीन लाख ६२ हजार ५९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी सोमवारी दिली.
कोपरीतील आनंदनगर येथील रहिवाशी धनश्री देशमुख हिला अल्फिया रुम आणि स्टीव चार्ली यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे संपर्क साधला होता. त्यांनी संगणक साधनसामुग्रीचा वापर करुन इन्स्टाग्रामवर अल्फीया या नावाने खाते बनविले. त्याद्वारे शेअर्स आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले. स्वत:ची अल्फीया या कंपनीचा प्रतिनिधी असल्याची ओळख सांगून अल्फिया रूम आणि स्टीव चार्ली अशी नावे या दोघांनी सांगितली. त्यानंतर २ जुलै ते ८ जुलै २०२२ या कालावधीत धनश्री हिला व्हाट्सअपसह इन्स्टाग्राम आणि इतर माध्यमांव्दारे संपर्क करुन त्यांच्या कंपनीत तीन लाख ६२ हजार ५९९ रुपये दोन वेगवेगळया युपीआय आयडीवर भरण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला त्यांनी कोणताही जादा परतावा तसेच स्वीकारलेली रक्कमही परत न करता सर्व माध्यमांद्वारे ब्लॉक करुन तिची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धनश्री हिने याप्रकरणी अखेर कोपरी पोलिस ठाण्यात २५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. हे दोन्ही आरोपी पसार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.