3 Honor Tilak with his greetings | १०० सूर्यनमस्कार घालून टिळकांना आदरांजली
१०० सूर्यनमस्कार घालून टिळकांना आदरांजली

डोंबिवली : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शताब्दी पुण्यस्मरण वर्षाला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. लोकमान्य टिळक यांच्या ९९ व्या पुण्यतिथीनिमित्त डोंबिवलीचे शैलेंद्र रिसबूड यांनी सरदारगृह येथे १०० सूर्यनमस्कार घालून टिळक यांना आदरांजली वाहिली.
टिळक यांनी मुंबईतील सरदारगृह येथे अखेरचा श्वास घेतला. त्याठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. सरदारगृह येथे हा उपक्रम राबविण्यात यावा, अशी संकल्पना केसरीच्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना खरे यांनी मांडली. त्यानुसार, रिसबूड यांनी हा उपक्रम राबवला. गुरुवारी सकाळी सरदारगृहात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रिसबूड यांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली.

डोंबिवलीत शिवमंदिर रोडला ते राहतात. त्यांचे शालेय शिक्षण एस.के. पाटील विद्यालयात झाले. त्यानंतर ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातून त्यांनी बीएस्सीची पदवी घेतली. काही काळ त्यांनी बँकेत नोकरी केली. २०१२ ला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत आता घरूनच काम करतात. त्यांचे आजोबा आणि वडील हेदेखील सूर्यनमस्कार घालत होते. त्यामुळे रिसबूड यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच सूर्यनमस्काराची गोडी लागली होती. रिसबूड यांचे आजोळ हे रत्नागिरीजवळील खेड या गावाजवळ होते. त्यांचे आजोबा शंकर बर्वे हे व्यवसायाने वकील होते. ते खेड नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते. त्याकाळात टिळक त्यांच्या घरी आले होते. त्यांचा छोटासा चहापानाचा कार्यक्रमही झाला होता. तेव्हापासून त्यांचे आणि टिळक यांचे ऋणानुबंध जोडले गेले, ते आजतागायत कायम आहेत. त्यामुळेच आपण टिळकांना आदरांजली वाहत असल्याचे रिसबूड यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक स्वत: महाविद्यालयीन जीवनात व्यायाम करीत असत. त्यामुळे त्यांना व्यायामातून आदरांजली वाहण्याचा विचार केला. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा प्रकार करण्यासाठी कमी जागा लागते. साधने अधिक लागत नाही. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. या उद्देशाने सूर्यनमस्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे रिसबूड म्हणाले. टिळकांनी मुंबईत केशवजी नाईकांच्या चाळीत मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या घटनेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रिसबूड यांनी लोकमान्यांना दीड हजार सूर्यनमस्कारांची मानवंदना दिली होती. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत दररोज १२५ सूर्यनमस्कार त्यांनी घातले होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला १०० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळीही रिसबूड यांनी ३०० सूर्यनमस्कार घातले होते. एका दिवसात सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी १५० सूर्यनमस्कार त्यांनी घातले होते. याप्रमाणेच त्यांनी यापूर्वी १२ वेळा सूर्यनमस्कार घातले आहेत.

Web Title: 3 Honor Tilak with his greetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.