२७ गावांना पाणी देणार नाही
By Admin | Updated: March 24, 2017 01:05 IST2017-03-24T01:05:32+5:302017-03-24T01:05:32+5:30
केडीएमसीतील २७ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसागणिक गंभीर बनत आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी या गावांमधील

२७ गावांना पाणी देणार नाही
कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दिवसागणिक गंभीर बनत आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी या गावांमधील नगरसेवकांनी आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन तात्पुरत्या स्वरूपात का होईना महापालिकेने त्यांच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्याला माजी महापौर व शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप यांनी विरोध केला आहे. आता कुठे आमचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. गावांना पाणी दिल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती त्यांनी व्यक्त करत तात्पुरते पाणी देण्यास नकार दिला आहे. त्यांचा विरोध पाहता पाण्यावरून शहरी आणि ग्रामीण भागातील नगरसेवकांमध्ये वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
२७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. परंतू ते पुरेसे प्रमाणात मिळत नाही, असे तेथील नगरसेवकांचे म्हणणे आहे. यंदाच्या पावसाळ््यात चांगला पाऊस होऊनही सध्या पाण्याची कमतरता गावांमध्ये भेडसावत आहे. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नगरसेवकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन अतिरिक्त पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, आजतागायत याची अंमलबजावणी झालेली नाही. पुरेशा पाण्याअभावी गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने मागील आठवड्यात २७ गावांतील नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर हंडाकळशी मोर्चा काढला होता. यावर सोमवारी २७ गावांमधील नगरसेवकांना पाणीप्रश्नावर चर्चेसाठी आयुक्तांनी बोलावले होते. या वेळी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेने आम्हाला तात्पुरता दिलासा द्यावा, अशी विनंती केली. शासनाकडून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर झाला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होईस्तोवर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत न क रता महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पाणी गावांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
स्थायी समितीच्या बैठकीतही बुधवारी २७ गावांमधील पाण्याचा प्रश्न चांगलाच गाजला होता. काहीही करा पण गावांना पाणी द्या, नुसत्या खुर्च्या उबवू नका, तातडीने कृती आराखडा सादर झाला पाहिजे अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही, असा सज्जड इशारा सभापती रमेश म्हात्रे यांनी दिला. तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या योजनेतून पाणी देण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. परंतु, अधिकारी याची अंमलबजावणी करण्याबाबत टाळाटाळ करतात, याकडे ग्रामीण भागातील नगरसेवकांनी लक्ष वेधले होते.
एकीकडे काहीही करा पण गावांना पाणी द्या, असे जरी सभापती म्हात्रे यांनी प्रशासनाला आदेश दिले असलेतरी दुसरीकड घोलप यांनी मात्र महापालिकेच्या योजनेतून पाणी देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील
शिवसेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांची तात्पुरते पाणी देण्याची आग्रहाची मागणी असताना घोलप यांचा होत असलेला विरोध पाहता ग्रामीण आणि शहरी असा वाद उद्भवणार आहे. त्याचबरोबर शिवसेना पक्षातील नगरसेवकांमध्येच पाणीप्रश्नावरून जुंपण्याचीही चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)