२७ गावांचा पाणीप्रश्न कायमच राहणार

By Admin | Updated: March 1, 2016 02:34 IST2016-03-01T02:34:12+5:302016-03-01T02:34:12+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना सध्या एमआयडीसी पाणीपुरवठा करते. या गावांत सध्या पाण्याची समस्या तीव्र आहे.

27 water disputes will remain forever | २७ गावांचा पाणीप्रश्न कायमच राहणार

२७ गावांचा पाणीप्रश्न कायमच राहणार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांना सध्या एमआयडीसी पाणीपुरवठा करते. या गावांत सध्या पाण्याची समस्या तीव्र आहे. ज्या वेळी या गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अमलात येईल, तेव्हाच तेथील पाणीटंचाई संपुष्टात येईल, असे स्पष्टीकरण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने सोमवारी पार पडलेल्या महासभेत दिले.
२७ गावांच्या पाणीबिलापोटी असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी भरली जात नसल्याने या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस एमआयडीसीने बजावली होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थ हवालदिल झाले होते. या प्रश्नावर नगरसेवक रमाकांत पाटील यांनी महासभेत सभा तहकुबीची सूचना मांडली होती. त्यावर चर्चा झाली. या वेळी पाण्याची समस्या केवळ २७ गावांत नसून शहरातही आहे. पाण्याचा प्रश्न शहरालाही तितकाच भेडसावतो आहे, असे म्हणणे अधिकाऱ्यांनी मांडले.
भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी पालिकेचे अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप केला. पालिकेने २७ गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जो आराखडा मंजूर केला आहे, त्याच्या कामाला अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. बोअरवेल खोदल्या जात असल्या, तरी पाणी लागत नसल्याने त्या खोदून काय उपयोग होणार, असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले, पाण्यासाठी जो कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, तो २० कोटी रुपये खर्चाचा आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आणखी १५ दिवस लागतील. त्यात वितरण व्यवस्था सुधारणे, जलकुंभ बांधणे, यांचा समावेश आहे. ही कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार आहेत. पाणीबिलाच्या थकबाकीवर
निर्णय होणे बाकी...
२७ गावांच्या थकबाकीसंदर्भात आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, एमआयडीसीने २७ गावांच्या पाणीबिलाची थकबाकी ७२ कोटी ६६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे.
ही थकबाकीची रक्कम एकाच हप्त्यात भरणे शक्य नाही. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केल्यावर त्यांना मालमत्ताकर जरी लागू केला, तरी किमान सहा वर्षे तरी जुनीच करप्रणाली असावी, असा नियम आहे. गावे ग्रामपंचायतीत होती. त्यानुसार, एमआयडीसीने दर आकारावे.
त्यांनी गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यावर महापालिकेचा दर आकारून थकबाकी दाखवली आहे. एमआयडीसीला महापालिकेने दर कमी करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात एमआयडीसीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक होऊन त्यावर तोडगा काढला जाणार आहे. जलस्वराज्य योजनेतील कामे अपूर्ण...
२७ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलस्वराज्य योजनेंर्तगत कामे केली आहेत. त्यासाठी त्यांनी जलवाहिन्या टाकल्या होत्या. जलवाहिन्या टाकल्या, पण जलसाठवणुकीसाठी उभारलेले जलकुंभ कमी उंचीचे असल्याने त्यातून योग्य प्रकारे पाण्याचे वितरण होऊ शकत नाही. जलस्वराज्य योजनेचे काम अपूर्णच असल्याने केवळ निधी खर्च झाला आहे, असे कार्यकारी अभियंता जुनेजा यांनी निदर्शनास आणले. नगरसेविकेच्या मुलाची महिलांना शिवीगाळ
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील भेंडीपाडा येथील अपक्ष नगरसेविका हिराबाई जावीर यांच्या मुलाने प्रभागातील महिलांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रभागातील सांडपाणी हे आपल्या घरासमोर साठत असल्याने ते साफ करावे, अशी तक्र ार प्रतिमा जाधव आणि पाच महिला करण्यासाठी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास जावीर यांच्या घरी गेल्या होत्या. मात्र, सफाई करणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे सांगून त्यांच्या मुलाने या महिलांना शिवीगाळ केली. या प्रकरणी प्रतिमा जाधव यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्र ार केली असता त्याच्याविरोधत अदखलपत्र गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 27 water disputes will remain forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.