२७ गावे संघर्ष समिती वाऱ्यावर

By Admin | Updated: March 27, 2016 02:23 IST2016-03-27T02:23:21+5:302016-03-27T02:23:21+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत परस्परांचे वाभाडे काढणाऱ्या शिवसेना-भाजपाने पालिकेच्या पोटनिवडणुकीत मात्र युती केली आहे. २७ गावांतील दोन्ही प्रभाग या पक्षांनी

27 villages conflict committee winds | २७ गावे संघर्ष समिती वाऱ्यावर

२७ गावे संघर्ष समिती वाऱ्यावर

कल्याण/चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत परस्परांचे वाभाडे काढणाऱ्या शिवसेना-भाजपाने पालिकेच्या पोटनिवडणुकीत मात्र युती केली आहे. २७ गावांतील दोन्ही प्रभाग या पक्षांनी वाटून घेतले आहेत. दोन्ही पक्षांच्या या समझोत्यात या गावांतील असंतोषाचे नेतृत्व करणारी संघर्ष समिती मात्र वाऱ्यावर सोडली असून त्यांच्या नेत्यांची कोंडी झाली आहे. त्याच वेळी मनसेने ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. संघर्ष समिती आणि भाजपामध्ये फाटाफूट होईल, असे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. ते शनिवारच्या घडामोडींनंतर खरे ठरले.
निवडणुकीपूर्वी शिवसेनेला विरोध करत भाजपासोबत जाणाऱ्या संघर्ष समितीला भाजपाने गावे वगळण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर हे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगून भाजपाच्या नेत्यांनी संघर्ष समितीची बोळवण केली होती. तोवर, शिवसेनेने वेगवेगळे प्रकल्प, पाणीप्रश्नावरील तोडगे काढत ही गावे महापालिकेतच राहतील, अशी व्यवस्था केली होती. त्यामुळे भाजपाने आपले पाय रोवले, मते मिळवली आणि संघर्ष समितीची कोंडी केल्याची भावना समितीच्या नेत्यांत असून त्यांनी शिवसेना, भाजपाला पाठिंबा न देता निवडणुकीवर बहिष्कार कायम असल्याचे जाहीर केले आहे.
२७ गावांतील दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी युती करताना प्रभाग क्र मांक ११४ हा भोपर-संदपचा प्रभाग भारतीय जनता पक्षाला, तर प्रभाग क्र मांक ११९ हा आशेळे -माणेरे चा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला आला आहे.

पोटनिवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आहे. त्यानुसार, शिवसेना आशेरे-मणेरेमध्ये उमेदवार देईल.
- गोपाळ लांडगे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख

आम्ही या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे, तो मागे घेणार नाही. भारतीय जनता पक्षाला निवडणूक लढवायची असेल तर ते स्वतंत्र आहेत. यातून २७ गावांतील ग्रामस्थांना जो संदेश जायचा, तो जाईल. मात्र, २७ गावांतील लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि सद्सद्विवेकबुद्धी वापरून शिवसेना-भाजपाने आमच्या बहिष्काराला साथ द्यायला हवी.
- चंद्रकांत पाटील, सरचिटणीस,
२७ गावे संघर्ष समिती

Web Title: 27 villages conflict committee winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.