खडवलीत अतिसारामुळे २५ जण रुग्णालयात
By Admin | Updated: June 12, 2016 01:04 IST2016-06-12T01:04:50+5:302016-06-12T01:04:50+5:30
खडवलीच्या पश्चिम भागात अतिसाराची लागण झाली असून साधारण २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. खडवली प्राथमिक आरोग्य

खडवलीत अतिसारामुळे २५ जण रुग्णालयात
टिटवाळा : खडवलीच्या पश्चिम भागात अतिसाराची लागण झाली असून साधारण २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. खडवली प्राथमिक आरोग्य केंद्रात पहाटेपासून रुग्णांची रीघ लागताच सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून अनेक अधिकाऱ्यांनी तेथे भेट दिली. दूषित पाण्यामुळे ही साथ पसरल्याचा अंदाज असून त्यासाठी पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.
आजारी व्यक्तींपैकी वर्षा खंडागळे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, अनिता तलसानिया या मुलीला कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पहाटे ४ वाजल्यापासून खडवली प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिसाराचे रुग्ण येण्यास सुरुवात झाली. रुग्णांत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच डॉक्टरांनी ते कोणत्या परिसरातील आहेत, ते पाहून आपला मोर्चा खडवली पश्चिमेकडे वळवला. वैद्यकीय पथकासह डॉक्टर सचिन चपलवार तेथे दाखल झाले. तेथील रुग्णांना खडवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या वेळी परिसरात जवळपास २५ रुग्ण आढळून आले.
दोन दिवसांपूर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यात गटाराचे दूषित पाणी शिरल्याचा हा परिणाम असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. या घटनेनंतर खडवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी लागण झालेल्या भागात पाहणी केली. परिसरातील नागरिकांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी औषध पुरवण्यात आले आहे. (वार्ताहर)