स्मारकासाठी २५ कोटींचे अनुदान
By Admin | Updated: March 21, 2017 01:45 IST2017-03-21T01:45:27+5:302017-03-21T01:45:27+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आझादनगर या आरक्षित भूखंडावरील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ५० कोटींचा

स्मारकासाठी २५ कोटींचे अनुदान
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आझादनगर या आरक्षित भूखंडावरील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने किमान २५ कोटींचे अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याने निधी उपलब्ध होण्याची शक्यता सरनाईक यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि त्यांच्या जीवनावर आधारित माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात यावे, यासाठी आ. सरनाईक अनेक वर्षापासून पालिकेकडे पाठपुरावा करीत होते. हे स्मारक मंजूर होऊन शहर विकास योजनेतील आझादनगर येथील सामाजिक वनीकरण व उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर साकारण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली होती. या जागेच्या ४६ हजार ७०० चौरस मीटरपैकी ३० हजार ५३३ चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. या जागेपैकी १५ टक्के म्हणजेच ४ हजार ५८० चौरस मीटर जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व त्यांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय प्रस्तावित आहे. नियोजित स्मारकामध्ये बाळासाहेबांचा जीवनप्रवास, फोटो संग्रहालय, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांनी काढलेली व्यंगचित्रे, त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या चित्रफिती आदी माहिती संग्रहित करण्यात येणार आहे.
उर्वरित जागेवर अॅम्पी थिएटर व प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून थीम पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे ५० कोटींहून अधिक खर्चाच्या या स्मारकाचे सादरीकरण काही दिवसांपूर्वीच आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे करण्यात आले होते. त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर त्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मात्र, स्मारकासाठी आवश्यक निधी पालिकेच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यासाठी सरकारी अनुदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही सरनाईक यांनी आयुक्तांना दिली. यानुसार, पालिकेकडून दोन टप्प्यांत २५ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. उर्वरित २५ कोटींच्या निधीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)