२५ कोटींची कामे रखडणार

By Admin | Updated: May 11, 2016 02:02 IST2016-05-11T02:02:33+5:302016-05-11T02:02:33+5:30

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका अंबरनाथमधील विकासकामांनाही बसणार आहे. महिनाभर ही आचारसंहिता राहणार असल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पुढे ढकलावी लागणार आहेत

25 crore works | २५ कोटींची कामे रखडणार

२५ कोटींची कामे रखडणार

पंकज पाटील,  अंबरनाथ
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका अंबरनाथमधील विकासकामांनाही बसणार आहे. महिनाभर ही आचारसंहिता राहणार असल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पुढे ढकलावी लागणार आहेत. त्यामुळे २५ कोटींची कामे रखडणार आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक होऊन वर्ष झाले. या कालावधीत प्रभागांत एकही कामे झालेली नाहीत. आर्थिक तरतूद नसल्याने अनेक कामे मंजूर असतानाही प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. पहिल्या सर्वसाधारण सभेत २५० कोटींची कामे मंजूर झालेली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागांत २५ लाखांचे विषय घेत नव्याने कामे मंजूर केली. या सर्व कामांना मंजुरी मिळाल्यावर त्यांच्या निविदाही प्रशासनाने काढल्या. या निविदांना मागील आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीही मिळाली. मात्र त्या कामांचे आदेश देण्याआधीच आचारसंहिता लागू झाली. परिणामी ही सर्व कामे महिनाभर रखडणार आहेत. गेल्या वर्षभरात एकही काम न झाल्याने नगरसेवक आधीच अस्वस्थ आहेत. त्यातच आता आचारसंहितेमुळे पुन्हा त्यांच्या प्रभागातील कामांना विलंब होणार आहे.
पालिका प्रशासनाने सरासरी १७ कोटींची कामे मंजूर केली आहेत. तर काही महत्त्वांच्या रस्त्यांची कामे विचारात घेता सरासरी २५ कोटींच्या विकासकामांना महिनाभर विलंब होणार आहे. पावसाळ्याआधी कामे करून घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या नगरसेवकांना ऐन पावसाळ्यातच ही सर्व कामे करावी लागणार आहे.
अनेक प्रभागांतील नगरसेवकांनी पेव्हर ब्लॉक, चेकर्स टाईल्स, गटार दुरुस्ती, डांबरी रस्ते आणि सीसी पायवाटा ही कामे मंजूर करून घेतली आहेत. वर्षभरानंतर तरी ही कामे व्हावीत, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनामार्फत एकही कामे होणार नाही, हे निश्चित झाल्याने आता पालिकेतही शुकशुकाट पसरला आहे.

Web Title: 25 crore works