जलयुक्त शिवारच्या १३०१ कामांसाठी २२ कोटी

By Admin | Updated: September 13, 2016 02:19 IST2016-09-13T02:19:37+5:302016-09-13T02:19:37+5:30

जलयुक्त शिवारसाठी यंदा १८ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये या आर्थिक वर्षात विविध स्वरूपाची एक हजार ३०१ कामे हाती घेतली आहेत

22 crores for the construction of the water tank | जलयुक्त शिवारच्या १३०१ कामांसाठी २२ कोटी

जलयुक्त शिवारच्या १३०१ कामांसाठी २२ कोटी

ठाणे : जलयुक्त शिवारसाठी यंदा १८ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये या आर्थिक वर्षात विविध स्वरूपाची एक हजार ३०१ कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी सुमारे २२ कोटी १५ लाख खर्च होणार आहेत.
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेत शहापूर तालुक्यातील बाभरे, सावरोली, कराळे, बांधिवली, शिरोळ, वेहळोली, अजनूप या सात गावांचा समावेश आहे. मुरबाडच्या खुटल, बारागाव, मेंदी, केदुर्ली, डोंगरन्हावे, तुळई गावांत योजना राबवली जाणार आहे. याशिवाय, घोटगावर ता. भिवंडी, मामनोली ता. कल्याण आणि अंबरनाथमधील कुशिवली गावांचा समावेश आहे.
गावांतील जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. कृषी विभागाद्वारे २३ कामे, जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाची आठ कामे होणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८७ लाख मिळणार असून सीएसआरपोटी १९ लाख १२ हजार प्राप्त होणार आहेत.
यंदा भातपिकाचे उत्पादन प्रतिहेक्टरी २५.५० किलो काढण्यात येणार आहे. त्यासाठी काही स्थानिक वाणांची लागवड करण्यात येणार आहे. यासोबतच कडधान्य व भाजीपाला घेण्यावरही भर असेल. सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा गट तयार केला जाईल. मोहापासून तेल तसेच मोगरा शेतीसाठी लागवड अशी काही उद्दिष्टे आम्ही निश्चित केली आहेत. यासाठी पाण्याच्या बाबतीत आम्हाला स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. त्यामुळेच यंदा जलयुक्त शिवाराची कामे अधिक नियोजनबद्धरीतीने पूर्ण करणार असल्याचा विश्वास कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी व्यक्त केला.

Web Title: 22 crores for the construction of the water tank