200-bed hospital in sports complex | क्रीडासंकुलात २०० बेडचे रुग्णालय

क्रीडासंकुलात २०० बेडचे रुग्णालय

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवली क्रीडासंकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात २०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू केले जाणार आहे. ८ जूनपर्यंत रुग्णालयाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
क्रीडासंकुलाच्या जागेचा वापर कोविड रुग्णालयासाठी करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली होती. त्याची दखल घेऊ न महापौर विनीता राणे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सोमवारी सायंकाळी महापौर आणि आयुक्तांनी बंदिस्त सभागृहाची पाहणी केली. यावेळी शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली, आयएमए कल्याणचे सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील, डोंबिवली अध्यक्ष डॉ. वंदना धाकतोडे, विषाणू प्रतिबंधक तज्ज्ञ डॉ. सुप्रिया अमेय उपस्थित होते.
या रुग्णालयातील सर्व बेडला आॅक्सिजनची सुविधा असेल. त्याचबरोबर १० बेडचे मिनी आयसीयू उपलब्ध करून दिले जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात महापालिकेस तीन हजार ४५८ बेडची आवश्यकता आहे. महापालिकेने ३५०० बेडची व्यवस्था केली आहे.
कोरोना योद्ध्यांच्या पाठीवर पडणार थाप
मुंब्रा : कोरोनाच्या संकट काळातही स्वत:च्या जीवाची काळजी न करता इतरांची सेवा करत असलेल्या मुंब्य्रातील कोरोना योद्धांना 'रियल हिरो आॅफ मुंब्रा' हा किताब देऊन त्यांच्या कामाचा सन्मान करण्याचा निर्णय उम्मीद फाउंडेशनने घेतला आहे हा किताब डॅक्टर,साफसफाई करणारे कर्मचारी पत्रकार तसेच जेवणासह इतर जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करत असलेल्यांना देण्यात येणार आहे. यासाठी फाउंडेशन या क्षेत्रात काम करत असलेल्यांकडून अर्ज भरून घेणार आहे. पुरस्कारामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी अर्जातील माहिती भरून देणाऱ्यांच्या कामाची तंटस्थ समितीमार्फत शहानिशा करण्यात येणार आहे. शहानिशाअंती समिती ज्याची निवड करेल त्यांचा लॉकडाउननंतर सन्मान करणार असल्याचे परवेज फरीद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

उल्हासनगरमध्ये
४१२ रुग्ण
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा ४०० पार झाला तर एकाचा मृत्यू झाला. आज ३२ नवे रुग्ण आढळून आले असून आजपर्यंत १५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंतित आहे.

Web Title: 200-bed hospital in sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.