विषबाधेने २० पशुपक्ष्यांचा मृत्यू
By Admin | Updated: January 10, 2016 00:23 IST2016-01-10T00:23:45+5:302016-01-10T00:23:45+5:30
नवघर पोलिसांच्या हद्दीतील सरस्वतीनगर परिसरात वावरणाऱ्या १५ भटक्या कुत्र्यांसह ३ कावळे व २ मांजरांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ जानेवारीला

विषबाधेने २० पशुपक्ष्यांचा मृत्यू
- राजू काळे, भार्इंदर
नवघर पोलिसांच्या हद्दीतील सरस्वतीनगर परिसरात वावरणाऱ्या १५ भटक्या कुत्र्यांसह ३ कावळे व २ मांजरांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ९ जानेवारीला प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे.
येथील मैदानाला लागूनच तिवरक्षेत्र असल्याने त्यात लांडग्यांचा वावर असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत असल्याने सुरुवातीला आढळलेल्या मृत कुत्र्यांमुळे स्थानिकांना लांडग्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आला होता. परिसरातील प्राणिमित्र सरिताम अशोक उभे, लता पुजारी, लव्हली बाली, विशाल दीक्षित यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला असता ठिकठिकाणी १५ पेक्षा अधिक कुत्री, २ मांजरे व ३ कावळे बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी अनेक कुत्र्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून त्यांना विषबाधाच झाल्याच्या अंदाजावरून प्राणिमित्रांनी स्थानिक नगरसेवक राजू वेतोस्कर यांना घटनेची माहिती दिली. वेतोस्कर यांनी त्वरित पालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व डॉ. दीपक कुरुळेकर यांना संपर्क साधला. उपायुक्तांनी पालघर जिल्ह्याच्या पशुधन विकास विभागाच्या सहायक आयुक्तांना संपर्क साधल्यानंतर वसईतील पशुधन विकास अधिकारी प्रदीप म्हात्रे दुपारी १२.१५ वा.च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेशुद्धावस्थेतील कुत्र्यांची तपासणी केली असता त्यातील १५ कुत्र्यांसह ३ कावळे व २ मांजरांचा मृत्यू झाल्याचे सांगून २ कुत्र्यांसह त्यांच्या २ पिलांना वाचविण्यात यश मिळविले.
याप्रकरणी नवघर पोलिसांत नोंद केली असून वैद्यकीय अहवालानंतरच घटनेचे कारण स्पष्ट होणार असले तरी विषबाधेप्रकरणी तपास सुरू करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी सांगितले.