नवीन वर्षात २० टक्के पाणीकपात

By Admin | Updated: December 26, 2016 06:38 IST2016-12-26T06:38:10+5:302016-12-26T06:38:10+5:30

जिल्ह्यातील पाच महापालिका आणि दोन नगरपालिकांनी लघुपाटबंधारे विभागाचे आदेश धाब्यावर बसवून नोव्हेंबर महिन्यापासून

20 percent watercolom in the new year | नवीन वर्षात २० टक्के पाणीकपात

नवीन वर्षात २० टक्के पाणीकपात

सुरेश लोखंडे/ठाणे
जिल्ह्यातील पाच महापालिका आणि दोन नगरपालिकांनी लघुपाटबंधारे विभागाचे आदेश धाब्यावर बसवून नोव्हेंबर महिन्यापासून ५ ते १० टक्के अतिरिक्त पाणी उचलत असल्याचे निदर्शनास आले असल्याने नववर्षाची पहाट १० ते २० टक्क्यांची पाणीकपात घेऊनच उजाडणार आहे. सध्या वेगवेगळ्या महापालिकांनी लागू केलेली कपात ही स्वयंघोषित असून आपल्या पाणीचोरीवर पांघरूण घालण्याचा केलेला तोकडा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
महापालिकांसह पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांच्या रोजच्या पाणीवापराची नोंद केली जात असून मंजूर कोट्यापेक्षा कुणी किती टक्के जादा पाणी उचलले, त्याचे आॅडिट डिसेंबर महिनाअखेर केले जाणार आहे. सोमवार, २ जानेवारी रोजी बैठक घेऊन लघुपाटबंधारे विभाग संपूर्ण जिल्ह्याकरिता १० ते २० टक्के पाणीकपात जाहीर करणार आहे. यामुळे नूतन वर्षारंभीच गृहिणींना पाणी संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
बारवी धरणासह उल्हास नदी, बदलापूर बंधारा आणि मोहने बंधारा यातील उपलब्ध पाणीसाठ्यातून ठाणे महापालिकेच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांप्रमाणेच अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांना रोज पाणीपुरवठा होत आहे. एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, टेमघर आणि काही मनपा स्वत:च्या जलस्रोताद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. मात्र, या पाणीसाठ्यावर पाटबंधारे खात्याचे नियंत्रण आहे. पुढील वर्षीच्या जुलैपर्यंत पाणी पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे १५ नोव्हेंबरपासून त्यांनी जादा पाणी उचलण्यावर बंदी घातली होती. तरीही, मंजूर कोट्यापेक्षा सर्वांकडूनच ५ ते १० टक्के जादा पाणी उचलले गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे जादा पाणी उचलण्यावर निर्बंध लागू केले होते. आता दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० ते २० टक्के कपात लागू केली जाईल. महापालिका, नगरपालिकांनी अतिरिक्त पाणी उचलल्याची भरपाई करण्याकरिता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला होता. यानंतरही अतिरिक्त पाणी उचलल्यास दंडात्मक कारवाई अथवा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्याचे अधिकार पाटबंधारे विभाग वापरू शकेल.

Web Title: 20 percent watercolom in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.