भिवंडी दुर्घटनेत २० लहानग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 12:42 AM2020-09-24T00:42:48+5:302020-09-24T00:43:17+5:30

काही कुटुंबांतील दोन ते तीन मुले दगावली : तळमजल्यावरील दलदलीत इमारतीचे दोन मजले रुतले

20 children killed in Bhiwandi building collapse incident | भिवंडी दुर्घटनेत २० लहानग्यांचा मृत्यू

भिवंडी दुर्घटनेत २० लहानग्यांचा मृत्यू

googlenewsNext


नितीन पंडित।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी शहरातील जिलानी इमारत दुर्घटनेत दीड ते पंधरा वर्षे वयोगटातील तब्बल २० मुलामुलींचा हकनाक बळी गेला. काही माता-पित्यांनी दोन ते तीन मुले या दुर्घटनेत गमावली आहेत. आपल्या चिमुरड्यांचा मृतदेह पाहून त्यांनी फोडलेले हंबरडे काळीज पिळवटून टाकणारे होते. यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण शोकाकुल झाले होते.
या दुर्घटनेत मरण पावलेल्या लहान मुलांमध्ये फातिमा बब्बू सिराज शेख (२), फुजेफा जुबेर कुरेशी (५), आकसा मोहम्मद आबिद अंसारी (१४), मोहम्मद दानिश आदिल अंसारी (११), फायजा जुबेर कुरेशी (५), आयशा कुरेशी (७), फातमा जुबेर कुरेशी (८), अफसाना अंसारी (१५), असद शाहिद खान (अडीच वर्षे), निदा आरिफ शेख (८), शबनम मोहम्मद अली शेख (१२), हसनैन आरिफ शेख (३), आरीफा मुर्तुजा खान (३), जैद जाबीर अली शेख (५), जुनैद जबीर अली शेख (दीड वर्षे), मरियम शब्बीर कुरेशी (१२), पलकबानो मो. मुर्तुजा खान (५), फराह मो. मुर्तुजा खान (६), शबाना जाबीर अली शेख (३), रिया खान (३) यांचा समावेश आहे. मध्यरात्री इमारत कोसळल्याने सर्वच लहान मुले साखरझोपेत होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने व नाकातोंडात धूळ गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या इमारतीत अनेक कामगार व मजूर परिवार परिवारासह राहत होते. तब्बल दोन ते अडीच दिवस ढिगारे उपसण्याचे काम सुरु राहिल्याने अनेक मृतदेह खराब अवस्थेत होते. त्यांची ओळख पटवण्यास विलंब लागत होता. काही कुटुंबातील जखमी सदस्य इस्पितळात उपचार घेत असल्याने मृतांची ओळख पटवण्यात अडचणी आल्या. दोन-तीन कुटुंबे या दुर्घटनेत नामशेष झाल्याने त्यांची नातलग बोलावून मृतांची ओळख पटवावी लागली. येथील रहिवासी मो. कुरेशी यांचा अडीच वर्षांचा मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या जिवाची घालमेल सुरु आहे. बुधवारी दुर्घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. कोरोनामुळे बघ्यांना तेथून हटवताना पोलिसांची तारांबळ उडाली होती.
इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना होता. कोरोना संकटामुळे तो पाच-सहा महिने बंद होता. इमारत धोकादायक झाल्याने तळमजल्यावरील या कारखान्यात जमिनीतून पाणी वर येऊ लागल्याने तसेच पावसाचे पाणी कारखान्यात शिरल्याने दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले होते. इमारत कोसळल्याने पहिला व दुसरा मजला त्या दलदलीत फसला. तिसºया मजल्यावरील ढिगाºयाखाली अडकलेल्या लोकांची
जलदगतीने सुटका तरी झाली किंवा तेथील मृतदेह सहज काढणे शक्य झाले. मात्र पहिल्या व दुसºया मजल्यावरील अनेक मृतदेह त्या दलदलीत फसल्याने एकतर ते बाहेर काढण्यात अडचणी आल्या व मृतदेहांची दुर्गंधी पसरली. त्यातच मंगळवारी रात्रीपासून पाऊस कोसळल्याने ढिगारे उपसण्याच्या कामात अनेक अडथळे आले.

२५ अतिधोकादायक इमारती पाडणार : शहरातील अतिधोकादायक २५ इमारती पाडण्याचा निर्णय महापालिकेनी घेतला आहे. त्यापैकी १९ इमारतींमधील रहिवाशांना या इमारतींमधून बाहेर काढण्यात आले आहे. सहा इमारती पाडण्यात आल्या आहेत. याखेरीज १९८ इमारती गंभीर धोकादायक असून त्या रिकाम्या करुन दुरुस्त करणे गरजेचे आहे. धोकादायक इमारतींना नोटिसा दिल्यावर त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट करुन या इमारतींना बाहेरुन किरकोळ डागडुजी करुन त्या वापरायोग्य असल्याचे प्रमाणपत्र काही स्ट्रक्चरल इंजिनीयरनी दिल्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. अशा इंजिनीयरवर कारवाई केली जाणार आहे.

मृत, जखमींच्या संख्येबाबत संभ्रम
च्जिलानी इमारतीच्या दुर्घटनेत ४१ मृत तर २५ जखमी झाल्याचा दावा केला जात असला, तरी पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार या दुर्घटनेत ३८ जण मृत तर १९ जण जखमी झाले आहेत.
च्सोमवारी रात्री दुर्घटना झाल्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी आले. ते येईपर्यंत सात जणांचे मृतदेह ढिगाºयातून बाहेर काढण्यात आले होते.
च्मात्र शिंदे यांनी १० मृतदेह बाहेर काढल्याची माहिती माध्यमांना दिल्याने, पुढील मोजदाद त्यानुसार झाली आणि तीन मृतांची तफावत झाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे
अन्यत्र पुनर्वसन करणार - अस्लम शेख

दरम्यान, राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी घटनास्थळाची पाहणी केली. ज्या शहरांची लोकसंख्या वाढली आहे, त्याठिकाणी अशा धोकादायक इमारतींचा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे पुनर्वसन कसे करता येईल, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून भिवंडीतील पुनर्वसनाच्या मुद्यावर मार्ग काढण्यात येईल. शासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून, आणखी मदत हवी असल्यास पुरवण्यात येईल, असे अस्लम शेख यांनी यावेळी सांगितले.

Web Title: 20 children killed in Bhiwandi building collapse incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.