१७ हजार रुपयांची रोकड केली परत!
By Admin | Updated: December 26, 2016 07:19 IST2016-12-26T07:19:57+5:302016-12-26T07:19:57+5:30
रस्त्यात गहाळ झालेली १७ हजार रुपयांची बॅग मनीष शहा (रा. देसलेपाडा) यांना ट्रॅफिक वॉर्डन निलेश भोईटे यांच्या प्रामाणिकपणामुळे

१७ हजार रुपयांची रोकड केली परत!
डोंबिवली : रस्त्यात गहाळ झालेली १७ हजार रुपयांची बॅग मनीष शहा (रा. देसलेपाडा) यांना ट्रॅफिक वॉर्डन निलेश भोईटे यांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली आहे. शहा यांनी हे पैसे त्यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जमवले होते. दरम्यान, भोईटे यांच्या या सच्चाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहा बुधवारी सायंकाळी १७ हजारांची बॅग घेऊन जात होते. मात्र, कौटुंबिक तणावामुळे ही बॅग त्यांच्याकडून गहाळ झाली. ती बॅग चाररस्त्यानजीक तेथे कर्तव्यावर असलेल्या भोईटे यांनी सापडली. ही बाब त्यांनी तातडीने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार, वाहतूक पोलीस ठाण्यात ती बॅग आणली असता त्यात काही कागदपत्रे आणि दोन हजार रुपयांच्या चार नोटा तसेच अन्य १०० रुपयांचे बंडल असे एकूण १७ हजार रुपये आढळले. भोईटे यांच्यासह पोलीस निरीक्षक मुरलीधर नाईकनवरे, प्रभारी अधिकारी गोविंद गंभीरे आदींनी कागदपत्रांची पाहणी केली. त्यात सापडलेल्या मोबाइल क्रमांकावर त्यांनी कॉल केला. तो फोन शहा यांच्या पत्नीकडे होता. पोलिसांनी घडलेली हकीकत त्यांना सांगितली. त्यानुसार, शहा यांनी वाहतूक पोलीस ठाण्याशी गुरुवारी संपर्क साधला.
कागदपत्रे व १७ हजारांंच्या नोटांचे वर्णन पटल्यानंतर गंभीरे, नाईकनवरे यांनी शहा यांना त्यांची बॅग परत केली. वाहतूक पोलिसांच्या या प्रामाणिकपणाबद्दल शहा यांनी समाधान व्यक्त केले. अजूनही माणुसकी शिल्लक असल्याची भावना शहा दाम्पत्याने व्यक्त केली. (प्रतिनिधी)