सदानंद नाईक उल्हासनगर : शॉर्ट टर्म व्हिसावर १७ पाकिस्तानी नागरिक शहरांत वास्तव्यास राहत असल्याची माहिती उघड होऊन त्याला पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी कबुली दिली. पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर त्यांना देश सोडून जाण्याचे फर्मान सरकारने काढल्याने, ते सोमवारी देश सोडून जाणार असल्याचेही गोरे म्हणाले. सर्व १७ पाकिस्तानी नागरिक हे सिंधी समाजाचे आहेत.
फाळणीच्या वेळी विस्थापित झालेला सिंधी समाजाला देशाच्या विविध भागात वसविण्यात आले. उल्हासनगरात वसविण्यात आलेल्या सिंधी समाजाचे अनेक नातेवाईक आजही पाकिस्तान मध्ये आहेत. सण व विविध उत्सावावेळी ते एकत्र येतात. भारतीय सिंधी सभेच्या पर्यंत्नातून आजपर्यंत १४० जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती सिंधी अकादमीचे महेश सुखरामनी यांनी दिली. गेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शहरातील सिंधूभवन मध्ये भारतीय नागरीकत्व देण्यात आलेल्या ६५ सिंधी नागरिकांनाचा सत्कार करण्यात आला होता. शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या १७ सिंधी समाजाच्या पाकिस्तानी नागरिकांना पहलगाम हल्ल्यानंतर देश सोडून जाण्याचे सरकारने आदेश काढले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी हे १७ पाकिस्तानी नागरिक २७ व २८ एप्रिल रोजी पाकिस्तान मध्ये जाणार असल्याची माहिती दिली.
शहरांत राहणाऱ्या बहुतांश सिंधी समाजाचे मूळ गाव पाकिस्तान मधील असून ८० वर्ष वयाच्या नागरिकांचा जन्म पाकिस्तान मधील आहे. एकमेकांचे नातेसंबंध टिकविन्यासाठी पाकिस्तान मधील सिंधी बांधव शहरांत राहत असलेल्या नातेवाईकाना भेटण्यासाठी शॉर्ट टर्म व्हिसा घेऊन येतात. उल्हासनगर मध्ये राहत असलेल्या सिंधी नागरिकांच्या शेती, घरे, दुकाने, नातेवाईक आजही पाकिस्तान मध्ये असल्याच्या आठवणी सांगतात. काही कारणास्तव त्यांचे भाऊ बहीण पाकिस्तान राहिले असून भीतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याची माहिती देतात. पाकिस्तान मधील शेकडो सिंधी समाजाने भारतीय नागरिकत्व घेतले. भारतीय सिंधू सभा अश्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती महेश सुखरामनी यांनी दिली आहे.