पाच महिन्यात मालमत्ता करापोटी केडीएमसीच्या तिजोरीत १६० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:27 IST2021-09-02T05:27:35+5:302021-09-02T05:27:35+5:30
कल्याण : एप्रिल ते ऑगस्ट २०२१ या पाच महिन्याच्या कालावधीत मालमत्ता करापोटी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत १६० कोटी ६४ लाख ...

पाच महिन्यात मालमत्ता करापोटी केडीएमसीच्या तिजोरीत १६० कोटी
कल्याण : एप्रिल ते ऑगस्ट २०२१ या पाच महिन्याच्या कालावधीत मालमत्ता करापोटी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत १६० कोटी ६४ लाख रुपये जमा झाले. पाच टक्के सवलत देण्याच्या घोषणेचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे. गतवर्षी याच कालावधीत जमा झालेल्या मालमत्ता करापेक्षा ४० कोटी अधिक जमा झाल्याने कोरोनामुळे आर्थिक ताण पडलेल्या केडीएमसीला दिलासा लाभेल, अशी अपेक्षा आहे.
मालमत्ता कराची रोख रक्कम, ऑनलाईन आणि धनादेशाद्वारे भरणाऱ्या करदात्यास मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्यात आली आहे. महापालिकेच्या या सवलतीस करदात्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच अवघ्या पाच महिन्यात महापालिकेने मालमत्ता करापोटी १६० कोटी ६४ लाख वसूल केले. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ११० कोटी १२ लाख रुपये जमा झाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीत ४० कोटी अधिक जमा केले. महापालिकेने गतवर्षी ४२८ कोटी रुपयांची वसुली केली. यंदाच्या वर्षी महापालिकेने कर वसुलीचे ३५० कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे. गतवर्षी कोरोनाची पहिली लाट असतानाही मालमत्ता कराची विक्रमी वसुली झाली होती. यंदा सुरुवातीच्या अवघ्या पाच महिन्यात महापालिकेने मालमत्ता कराचा गाठलेला टप्पा लक्षात घेता, पुढील सात महिन्याच्या कालावधीत वसुलीचा आलेख असाच चढता राहिला तर ३५० कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल होईल, अशी अपेक्षा आहे. महापालिकेस गेल्या दीड वर्षात जास्तीत जास्त पैसा हा कोरोनावर मात करण्यावर खर्च करावा लागला. महापालिकेने मार्च अखेरपर्यंत १३५ कोटी रुपये कोरोना नियंत्रणावर खर्च केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत असली तरी ती फार तीव्र नसल्यास कोरोनावरील खर्च नियंत्रित राहतानाच मालमत्ता कराची वसुली चांगली होईल, अशी अपेक्षा आहे.
-----------------------------
वाचली