सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत झालेल्या वादळ वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे इमारत दुर्घटना, वीज, झाडे पडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. गाय, म्हैस अशी तीन पशुधन दगावला आहेत. तसेच इमारतीसह १०७ घरांची पडझड हाेऊन नागरिक बेघर झाले. ३०३ शेतकऱ्यांच्या फळबागा, तृणधान्य आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या १५ दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. ठाण्यासह मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर या तालुक्यांमधील नागरिकांना विविध समस्यांना ताेंड द्यावे लागले. घरांवरील पत्रे व कौले उडून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. कल्याणला पूर्वेला इमारत काेसळून सहा जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कल्याण शहरात रिक्षावर झाड पडून तीन जणांचा मृत्यू झाला होता.
स्फोटात एक, वीज पडून तिघांचा मृत्यू
शहापूरला शाॅर्टसर्किटमुळे गॅस सिलिंडरच्या स्फाेटात एका व्यक्तीचा तर वीज पडून तीन जणांच्या मृत्यूची नाेंद झाली आहे. ठाणे शहरात झाड पडून एक जण दगावला. मुरबाड तालुक्यात दाेघांवर वीज पडून ते मरण पावले.
८८ हेक्टरवरील फळबागा, भाजीपाल्यांचे नुकसान
जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अंशत: पडझड झालेल्या घरांमध्ये सर्वाधिक ७२ घरे शहापूर तालुक्यामधील आहेत. या खालाेखाल भिवंडी तालुक्यातील २५ घरांची पडझड झाली. कल्याण तालुक्यामधील पाच घरे असून, उल्हासनगर शहरातीलही पाच घरांचे माेठे नुकसान झाले.
शहापूर तालुक्यात दाेन गायी आणि एक म्हैस दगावली. ३०३ शेतकऱ्यांना तब्बल ८८ हेक्टर शेतजमिनीवरील फळबागा, भाजीपाला, तृणधान्याच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील ५६ हेक्टरवरील आंब्याच्या बागांच्या नुकसानीचा १९४ शेतकऱ्यांना फटका बसला.
शेती नुकसानीमुळे मुरबाडचे ३३ गावांमधील शेतकरी बाधित झाले. भिवंडी तालुक्यामधील ३२ गावांच्या १०२ शेतकऱ्यांना ३२ हेक्टरचे नुकसान झाले. कल्याणमधील चार गावांच्या सात शेतकऱ्यांना तीन हेक्टरवरील शेतीच्या नुकसानीचा फटका बसला.