मॅट्रीमाेनीयल साइटवरून तरुणीला १६ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:11 IST2021-02-10T02:10:55+5:302021-02-10T02:11:08+5:30
यूकेमध्ये डाॅक्टर असल्याच्या भूलथापा

मॅट्रीमाेनीयल साइटवरून तरुणीला १६ लाखांचा गंडा
कल्याण : यूकेमध्ये एमडी डॉक्टर असल्याचे सांगून कल्याणमधील एका ३३ वर्षीय तरुणीला १६ लाख ४५ हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात प्रकाश शर्मा नामक व्यक्तीविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेली तरुणी खडकपाडा परिसरात राहणारी असून, नवी मुंबई येथील एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. या तरुणीने ‘जीवनसाथी डॉट कॉम’वर लग्नासाठी रजिस्ट्रेशन केले होते. यूकेमध्ये राहणाऱ्या प्रकाश शर्माने तिच्याशी संपर्क साधला आणि लग्नासाठी तयार असल्याचे तिला सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू होती. जानेवारीत भारतात येणार असल्याचे प्रकाश याने तिला सांगितले. २३ जानेवारीला शर्मा याने फोन करून सांगितले की, तो दिल्ली एअरपोर्टला आला आहे. मात्र, त्याच्याजवळ सोने असल्याने त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहे. यातून सुटण्यासाठी पैसे भरावे लागतील. असे सांगत त्याने तिच्याकडे प्रारंभी ६५ हजार रुपयांची मागणी केली. संबंधित तरुणीने नेटबॅकिंगद्वारे प्रकाशला ते दिले. त्यानंतरही २४, २५ आणि २६ जानेवारीला काही ना काही बतावणी करून शर्माने तिच्याकडून तब्बल १६ लाख ४५ हजार रुपये घेतले आणि तो अचानक गायब झाला. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे समजताच तरुणीने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाणे गाठत आरोपी शर्मा याच्याविरोधात तक्रार दाखल केली.