१६ बांधकामाचा रस्त्याला अडथळा कायम, गुणवंत्तेवरही प्रश्नचिन्हे
By सदानंद नाईक | Updated: November 21, 2025 19:08 IST2025-11-21T19:07:15+5:302025-11-21T19:08:17+5:30
उल्हासनगरातील कल्याण अंबरनाथ रस्ता होणार झिगझॅग, ६८ कोटींच्या निधीतून रस्त्यावर रस्ता

१६ बांधकामाचा रस्त्याला अडथळा कायम, गुणवंत्तेवरही प्रश्नचिन्हे
सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे ९ वर्षांपूर्वी १०० फुटी रुंदीकरण होऊनही, रस्त्याला बाधित १६ बांधकामांचा तिढा आजही कायम आहे. या बांधकामामुळे रस्ता 'झिगझॅग' होण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच ६८ कोटीच्या निधीतील रस्ता रस्त्यावर रस्ता बांधला जात असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
उल्हासनगर महापालिकेने ९ वर्षांपूर्वी कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे रुंदीकरण केले. या रुंदीकरणात एकूण ८२३ दुकानदार आणि घरे बाधित झाली होती. यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक बाधित झालेल्या नागरिकांना पर्यायी जागा इंदिरा गांधी भाजी मार्केटची जागा देण्याचे सुचविण्यात आली होते. तर अंशता बाधित झालेल्या दुकानदारांनी रुंदीकरणाच्या नावाखाली बहुमजली बांधकामे बांधली. मात्र पूर्णतः बाधित नागरिकांना पर्यायी जागा मिळाली नसून यातील काही जणांनी पर्यायी जागेसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. रस्त्यातील बाधित १६ बांधकामाचा प्रश्न निकाली लागला नसल्याने, बांधकामे आजही रस्त्यात उभी आहेत. ही बांधकामे सोडून रस्ता बांधण्याचा निर्णय राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतल्याने, रस्ता झिगझॅग होण्याची शक्यता निर्माण झाली.
६८ कोटीतुन बनतो रस्त्यावर रस्ता, गुणवत्तेवर प्रश्न
राज्य सरकारच्या ६८ कोटीच्या निधीतून रस्ता रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत आहे. रस्त्यावर रस्ता बांधण्यात येत असल्याने, रस्त्याच्या गुणवत्तेवर तसेच निविदेनुसार काम होत आहे की नाही?. याबाबत स्थानिक नेत्यांनी संशय व्यक्त केला.
१६ बांधकामामुळे रस्ता झिगझॅग
कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या आड येणारी १६ बांधकामे रस्त्यात आजही उभी आहे. ही बांधकामे वगळून रस्ता बांधण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. यामुळे हा रस्ता सरळ न होता, 'झिगझॅग' बनणार आहे.
स्थानिक पातळीवर समन्वय नाही
राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मानकर यांनी रस्त्याच्या आड येणाऱ्या १६ बांधकाम हटविण्याबाबत महापालिका बांधकाम विभागाला लेखी कळविले. मात्र याबाबत काहीएक माहिती व कारवाई महापालिकेकडून झाली नाही. अखेर ही बांधकामे वगळून रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
राज्य बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या आड येणाऱ्या बांधकाम बाबत महापालिकेला वारंवार विचारणा झाली. अशी कबुली महापालिका बांधकाम विभागाने दिली. या बांधकामाचे प्रकरण न्यायालयीन असल्याने विभागाने निर्णय घेतला नसल्याची माहिती कार्यकारी अभियंता निलेश शिरसाठे यांनी दिली.