सदानंद नाईक, उल्हासनगर: पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते पोलीस नियंत्रण कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष, सीसीटिव्ही कक्ष व कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरव करून सन्मानचिन्हे देण्यात आले.
उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत एकूण १५९३ सीसीटिव्ही कॅमेरे विविध ठिकाणी बसाविण्यात आले असून त्यापैकी ११३ कॅमेरे लाईव्ह राहणार आहेत. सीसीटिव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारी हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार असून गुन्ह्यांची उकल जलद होणार आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शनिवारी पोलीस नियंत्रण कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष यांच्या नूतनीकरणाचे तसेच नवीन सीसीटिव्ही कक्ष व कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपआयुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल काळे, शैलेश काळे यांच्यासह परिमंडळातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते महिला अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यांत ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल करणाऱ्या एकूण १३ अधिकारी व अंमलदार तसेच उत्कृष्ट तपास करणाऱ्या तपास पथकातील ४ अधिकारी व ७ अंमलदारांना प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. सीसीटिव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारावर वचक बसणार असून परिमंडळातील गुन्ह्याच्या उकली बाबत पोलीस आयुक्तानी समाधान व्यक्त करून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच सामान्य नागरिकांच्या सहकार्याबाबत पोलीस आयुक्त डुंबरे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पोलीस परिमंडळातील इतभूत माहिती पोलीस आयुक्ताना दिली.