१४०० विद्यार्थी हवालदिल
By Admin | Updated: June 16, 2016 01:08 IST2016-06-16T01:08:50+5:302016-06-16T01:08:50+5:30
ठाणे महापालिकेने नाल्यावरील बांधकामांवर हातोडा टाकण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू केली. त्यानुसार, आतापर्यंत सुमारे ७० बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर पालिकेने गडकरी

१४०० विद्यार्थी हवालदिल
ठाणे : ठाणे महापालिकेने नाल्यावरील बांधकामांवर हातोडा टाकण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू केली. त्यानुसार, आतापर्यंत सुमारे ७० बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर पालिकेने गडकरी रंगायतनसमोर असलेल्या अधिकृत शिवसमर्थ माध्यमिक विभागाची शाळा येत्या २४ तासांत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारची नोटीस हाती पडल्याने शाळा व्यवस्थापनाबरोबर येथे शिक्षण घेत असलेले सुमारे १४०० विद्यार्थी चक्रावले आहेत.
नाल्यावरील बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर शहरातील विविध भागांत नाल्यांवर असलेल्या बांधकामांचा सर्व्हे करून त्यावर कारवाईस सुरुवात केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत सुमारे ७० बांधकामांवर कारवाई केली आहे.
गडकरी रंगायतनच्या समोर असलेल्या शिवसमर्थच्या माध्यमिक शाळेलाही अशीच नोटीस बजावली आहे. यात शाळेची इमारत नाल्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही नोटीस बजावली. परंतु, याची माहिती शाळा व्यवस्थापन आणि विश्वस्तांना बुधवारी झाल्याने सर्व व्यवस्थापनच हादरून गेले. प्रत्यक्षात ही शाळा १९७८ च्या सुमारास उभारण्यात आली असून तिचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्चरल आॅडिटदेखील केले आहे. या आॅडिटनुसार ही शाळा आणखी १० वर्षे व्यवस्थित राहू शकते, असा अहवाल आहे.
पालिकेने अचानक अशा प्रकारची नोटीस बजावल्याने तेदेखील चक्रावले आहेत. त्यानुसार, या विश्वस्तांनी तत्काळ महापौर संजय मोरे यांनी भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. यासंदर्भात अतिक्रमण विभागाशी चर्चा करून ही नोटीस मागे घेण्यास सांगितल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.
तर, शाळा व्यवस्थापनाने यासंदर्भात महापालिकेशी पत्रव्यवहार केला असून अतिक्रमण विभागानेदेखील नोटीस मागे घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शाळेच्या विश्वस्तांनी दिली. आता पुढे काय होते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.