ठाणे : ठाणे आणि उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला बुधवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. माघारीची मुदत मंगळवारी संपल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाल्याने प्रत्येक प्रभागातील बहुरंगी लढती कशा असतील, ते नेमकेपणाने समोर आले आहे. यंदा प्रचारासाठी उमेदवारांना तब्बल १४ दिवस मिळणार आहेत. ज्यांना उमेदवारीची हमी होती, अशा उमेदवारांनी प्रचाराची बरीचशी तयारी आतापर्यंत केली आहे. १४ दिवसांतील प्रचाराचे तीन टप्पे करून त्यांच्या कामाची आखणी सुरू आहे. घरोघरी भेटीगाठी, मतदारांशी प्रत्यक्ष संवाद, त्यांच्यापर्यंत भूमिका-चिन्ह पोहोचवणे, उमेदवार म्हणून आपले काम त्यांना समजेल, अशी व्यवस्था करण्यावर त्यांचा पहिल्या टप्प्यातील भर आहे. तो साधारणत: शुक्रवारपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर, शनिवार ते पुढचा गुरुवार या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष गाठीभेटीतून अंदाज घेण्याचे, आश्वासनांचे काम केले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात शुक्रवार, १७ फेब्रुवारीपासून १९ तारखेला संध्याकाळी प्रचार संपेपर्यंत आपले नाव, आपले पॅनल, चिन्ह पोहोचवण्यावर उमेदवारांचा भर राहील. (प्रतिनिधी) व्हॅलेंटाइनलाही महत्त्व : एकेकाळी हिंदुत्ववादी राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेला व्हॅलेंटाइन डे यंदा महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यानच येतो आहे. राजकीय पक्षांत तरुण किंवा नव्या पिढीचे नेतृत्व येण्यापूर्वीच्या काळात व्हॅलेंटाइनला विरोध, दुकाने फोडणे, हा दिवस साजरा करणाऱ्यांवर हल्ला करणे, असे प्रकार राजकीय पक्षांच्या युवा शाखा हाती घेत. मात्र, गेल्या काही वर्षांत हा विरोध मावळला आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइनन डेच्या दिवशी तरुणतरुणींना कशा शुभेच्छा देता येतील आणि हा दिवस साजरा करणारे आपणही कसे तरुण उमेदवार आहोत, यावर सर्वांचा भर आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक आणि यू ट्यूबचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या टीमसोबत उमेदवारांच्याही स्वतंत्र टीम आहेत. एखाद्या प्रश्नावर उमेदवाराची भूमिका, प्रचार, त्यादरम्यान मिळालेला प्रतिसाद याची माहिती, फोटो, क्लिप, आॅडिओ टाकण्याची स्पर्धा उमेदवारांत सुरू आहे.17पासून चढणार जोरयंदाच्या प्रचारात दोन शनिवार आणि दोन रविवार उमेदवारांना मिळतील. त्यातील १७ ते १९ हा शेवटच्या तीन दिवसांचा टप्पा निर्णायक ठरेल. त्यातही, १८ आणि १९ तारखेच्या शनिवार-रविवारी मतदारांना प्रत्यक्ष गाठण्यावर उमेदवारांचा भर असेल. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सर्वाधिक सभा, रोड शो, चौक सभा, पदयात्रा याच काळात होतील, असा अंदाज आहे. मैदानांची मारामार : ठाणे आणि उल्हासनगरमध्ये मोठ्या सभा होतील, अशी मोजकीच मैदाने उरली आहेत. शेवटच्या सभांसाठी ती मिळवण्यासाठी सर्वांचीच खटपट सुरू आहे. त्यामुळे कमी खर्चात होणाऱ्या चौकसभा, पदयात्रा, रोड शोवरच सर्वांचा भर आहे. शिवरायांची जयंती : प्रचाराच्या शेवटच्या रविवारी तारखेनुसार शिवजयंती आहे. एरव्ही, त्या दिवशी मिरवणुका काढल्या जातात. यंदा आचारसंहितेमुळे प्रचारफेऱ्यांसोबतच या मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने महाराजांसह मावळ्यांची वेशभूषा करणाऱ्यांची मागणी वाढली आहे.ज्ञाती समूहांचे मेळावे : आपल्या प्रभागांतील वेगवेगळ्या ज्ञाती समूहांपर्यंत आपले काम पोहोचावे, त्यांच्या सण-उत्सवात आपण कसे सहभागी होतो, याची त्यांना आठवण करून देण्याचा उमेदवारांचा आटापिटा सुरू आहे. वेगवेगळे भाषक समूह, त्यांचे गट यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत.मॉर्निंग वॉक सुरू मतदारांना गाठण्याची एकही संधी सोडायची नसल्याने बुधवारपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांचेही मॉर्निंग वॉक सुरू झाले आहे. पदपथ, उद्याने, मैदानांत मतदारांसोबत फिरतफिरत प्रचार सुरू झाला आहे. तेथे मतदार जे सांगतात, त्या प्रत्येक गोष्टीला ‘हो’ करत सुहास्यवदनाने प्रचार सुरू आहे.उमेदवारांकडे मतदारयाद्या आॅनलाइनआपापल्या प्रभागांतील मतदारांच्या याद्या बहुतांश उमेदवारांनी एक्सेल शीट किंवा ओपन आॅफिसमध्ये किंवा प्रचाराचे कंत्राट दिलेल्या कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तयार ठेवल्या आहेत. त्यात बुथनिहाय मतदार, त्यांची परिसरनिहाय यादी, मतदानाला दांडी मारणारे, घरे बदललेले, घरे सोडून गेलेले, मरण पावलेले अशांवर वेगवेगळ्या खुणा केल्या आहेत. एखादा विभाग एका विशिष्ट पक्षाला किंवा उमेदवाराला नेहमी पाठिंबा देत असेल, तर तसा उल्लेख त्यात आहे. त्यामुळे तेथे किती भर द्यायचा, तेही ठरवणे सोपे जाते. शिवाय, त्यात प्रत्येक फेरीला मिळालेला प्रतिसाद नोंदवण्याचीही सोय आहे. त्यातून व्यूहरचना ठरवून मतदारांच्या संख्येचा अंदाज घेणे पूर्वीपेक्षाही सोपे झाले आहे. काही सॉफ्टवेअरमध्ये मतदारांच्या मोबाइल क्रमांकांची-मेलचीही नोंद असून त्यांना मेसेज पाठवणे आणखी सुलभ होते आहे. सोसायट्या टार्गेट : एकगठ्ठा मतांची हक्काची हमी मिळणाऱ्या झोपड्यांसह सध्या सोसायट्याही उमेदवारांच्या रडारवर आहेत. त्यांना आवारात पेव्हर ब्लॉक बसवून देणे, सीसीटीव्ही लावणे, अॅप्रोच रोडचे काम, दिवाबत्ती, पाण्याच्या टाक्यांची सफाई, वर्षभरासाठी केबल अशी वेगवेगळी आश्वासने देत उमेदवार सोसायच्यांना गाठत आहेत. त्यामुळे ‘एकमेव सेक्रेटरी’ भलतेच फॉर्मात आहेत. मतदारजागृतीवर भर : यंदा एका वॉर्डात चार उमेदवारांना मत द्यायचे असल्याने आणि तसे मत दिले तरच ते वैध ठरणार असल्याने मतदारांना ती माहिती देण्याची जबाबदारीही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक त्यातील अ, ब, क, ड असे चार उमेदवार, त्यांचे चिन्ह, मत कसे द्याल, एखादा उमेदवार पसंत नसेल तर दुसऱ्याला मत द्या किंवा नोटाचा वापर करा; अन्यथा मत बाद होईल, अशी मतदारजागृतीही सुरू आहे.
उमेदवारांच्या हाती १४ दिवस
By admin | Updated: February 9, 2017 04:09 IST