१३ दाम्पत्ये निवडणूक रिंगणात
By Admin | Updated: February 9, 2017 04:00 IST2017-02-09T04:00:46+5:302017-02-09T04:00:46+5:30
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांतील १३ दाम्पत्य रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये पाच दाम्पत्य सलग दुसऱ्यांदा रिंगणात आहेत.

१३ दाम्पत्ये निवडणूक रिंगणात
ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांतील १३ दाम्पत्य रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये पाच दाम्पत्य सलग दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. तर, सर्वाधिक ५ जोड्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून त्याखालोखाल शिवसेनेत ४, भाजपात ३ आणि काँग्रेस आणि मनसेत एकेक जोडी यंदा आपले नशीब आजमावत आहे. राष्ट्रवादीच्या वतीने प्रभाग क्र. २३ अ मधून मिलिंद पाटील, तर त्यांची पत्नी मनाली पाटील २५ ब मधून रिंगणात उतरले असून त्यांची ही दुसरी टर्म आहे. प्रभाग क्रमांक २३ क मधून पुन्हा एकदा केणी दाम्पत्य निवडणूक लढवत आहे.
२००७ मध्येदेखील हे जोडपे एकत्र लढले होते. परंतु, त्या वेळेस निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर, २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा ते निवडून आले होते. आता पुन्हा प्रभाग क्र. २६ अ मधून अनिता केणे आणि त्यांचे पती राजन किणे हे प्रभाग क्र. ३१ ड मधून निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. तर, प्रभाग क्र. २४ ब मधून मनीषा साळवी आणि त्यांचे पती महेश साळवी हे २५ अ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या खालोखाल आता प्रथमच प्रभाग क्रमांक २७ क आणि ड मधून विजय भोईर आणि त्यांच्या पत्नी संगीता भोईर या आपले नशीब आजमावत आहेत.
राष्ट्रवादीपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो तो शिवसेनेचा. शिवसेनेत चार दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रभाग क्र. ४ अ मधून हरिश्चंद्र पाटील आणि त्यांची पत्नी कल्पना पाटील या प्रभाग क्रमांक ७ ब मधून रिंगणात आहेत. मागील निवडणुकीतही हे दाम्पत्य निवडून आले होते. प्रभाग क्र. ८ ब मधून उषा भोईर आणि त्यांचे पती संजय भोईर ड मधून उभे आहेत. हे दाम्पत्यदेखील दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहे. प्रभाग क्र १० ड मधून संजय तरे आणि ११ अ मधून त्यांची पत्नी महेश्वरी तरे या निवडणूक रिंगणात आहेत. २०१२ मध्येदेखील त्यांनी निवडणूक लढवली होती परंतु, त्यामध्ये संजय तरे यांचा पराभव झाला होता. प्रभाग क्र. १५ ब मधून एकनाथ भोईर आणि प्रभाग क्र. १७ अ मधून त्यांची पत्नी एकता भोईर या निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत एकनाथ भोईर यांचा पराभव झाला होता.
प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या भाजपामध्ये यंदा तीन दाम्पत्य नशीब आजमावणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ४ क मधून आशादेवी शेरबहादूर आणि ड मधून त्यांचे पती शेरबहादूर सिंह, ११ ब मधून नंदा पाटील व त्यांचे पती कृष्णा पाटील हे ड मधून उभे आहेत. १५ अ मधून सुवर्णा कांबळे व त्यांचे पती विलास कांबळे हे ड मधून उभे आहेत. (प्रतिनिधी)